मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावात केवळ ४८ टक्केच पाणीसाठा शिल्लक उरला आहे. गेल्या तीन वर्षातील हा सर्वात कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे मुंबईला भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा मिळावा, अशी मागणी महानगरपालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे केली आहे. राज्य सरकारने ही मागणी मान्य न केल्यास मुंबईकरांना १ मार्चपासून १० टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.

मुंबई शहराला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांतून दररोज तीन हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. या सातही तलावांत गेल्या वर्षी १३ फेब्रुवारी रोजी सात लाख ९३ हजार ७०७ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक होता. तर यावर्षीच्या १३ फेब्रुवारी रोजी सात लाख १४ हजार ६१३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो सात हजार २० दशलक्ष लिटरने कमी आहे.

तलावांमध्ये असलेल्या पाणीसाठ्याच्या आधारे पुढील १८७ दिवस, म्हणजे ऑगस्टच्या मध्यापर्यंत तो पुरेसा आहे. मात्र, वेळेवर पाऊस न झाल्यास मुंबईत पाणीबाणीचं संकट निर्माण होऊ शकतं. हीच बाब लक्षात घेता महापालिका प्रशासनाने भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव पाण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!