मोखाडा तालुक्यातील ४५ गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष आहे. त्यामुळे आदिवासी पाड्यांना टॅकरने पाणी पुरवठा केला जातो. हे पाणी गावातील विहिरीत सोडले जाते. विहिरीतील पाणी आणण्यासाठी गावकरी एक ते दोन किलोमीटरचे अंतर चालावे लागते. या गावात शासनाने शौचालये बांधली असली तरी गावात पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे शौचालयासाठी कुठं पाणी वापरणार अशी हतबलता आदिवासी बांधवांनी व्यक्त केली. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे त्यानी सांगितले. परिवर्तन महिला संस्था मोखाडा तालुक्यातील ७० गावात काम करत आहे. येथील तरुणवर्ग रोजगारासाठी गाव सोडून जात आहे. या तरुणांना गावातच रोजगार मिळावा आणि त्यांचे स्थलांतर थांबावे , गावाचा विकास व्हावा यासाठी संस्थेच्या अध्यक्षा ज्योती पाटकर यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन महिला संस्था प्रयत्न करत असल्याचे वर्षा परकुरे यांनी सांगितले. नीळमातील पाडा येथील चंदर दळवी हा तरुण गावातील तरुणांना शिकण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. त्यासाठी त्यांना स्पर्धा परीक्षेत बसण्यासाठी आवाहन करून मार्गदर्शनही करीत आहे. गावात पाणी साठवण्यासाठी तळ बांधण्यात आले असून, केवळ पावसाळ्यात याचा उपयोग होत असल्याचे चंदरने सांगितले. संस्थेतील भास्कर देवळे हा गावतील काम पाहत असतो. मोखाडा तालुक्यातील ४० गावात पाणी टंचाई असून प्रत्येक गावात दोन ते तीन कुपोषित बालके आहेत. त्यामुळे मोखाड्यावासीयांपर्यंत विकास पोहचला नसून अच्छे दिनाची प्रतीक्षा लागून राहलीय.
***