सातारा – २५ मे – महाराष्ट्रातील रयत क्रांती संघटना, सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र आणि ऊस वाहतूकदार संघटना यांनी विविध मागण्या करत केलेल्या तीव्र संघर्षाला अखेर सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर जलद गतीने तोडगा काढण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेण्याचे लेखी आश्वासन सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिले. यावेळी सोबत माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आ. गोपीचंद पडळकर, आ जयकुमार गोरे, आ. शिवेंद्रराजे भोसले इत्यादी उपस्थित होते.
कराड येथील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन दि. २२ मे रोजी “वारी शेतकऱ्यांची” या महत्त्वाच्या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. शेतीची कामे अर्धवट सोडून सुरू असलेला संघर्ष आता आपला निर्धार दाखवत अखेर चौथ्या दिवशी सातारा येथे दाखल झाला. शेतकऱ्यांनी एकजुटीने एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी न्याय मागण्यासाठी शांततापूर्ण निषेध आंदोलन सुरू केले. शिवाय कांद्याचे भाव उतरल्याने गळ्यात कांद्याच्या माळा घालून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दुर्दशा निदर्शनास आणून दिली. तसेच हातात ऊस घेऊन पायी चालत ऊस वाहतूकदारांवर असणाऱ्या अन्यायकारक निर्बंधांचा निषेध नोंदवण्यात आला.
सदाभाऊ खोत म्हणाले की, “वारी शेतकऱ्याची” पदयात्रेला अपेक्षित यश मिळाले आहे, माझ्या मनात प्रचंड भावना भरून आल्या आहेत. बळीराजा हा या राज्यासाठी एक मार्गदर्शक प्रकाश बनून राहिला आहे, जो येथील सर्व नागरिकांना दिलासा देत आहे. परंतु दुर्दैवाने त्यांना त्यांच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलने करावी लागतात, हे दुर्दैवी वास्तव आहे. या राज्याच्या शासन व्यवस्थेत सुधारणांची नितांत गरज आहे. गेल्या चार दिवसांत या पदयात्रेत काळ्या आईची सेवा करणाऱ्या माझ्या माता भगिनी, ऊस वाहतूकदार, शेतकरी, शेतमजूर आणि सरपंच परिषदेचे सरपंच मंडळी सहभागी झाल्याबद्दल त्या सर्वांसाठी मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. सर्वांच्या अतुलनीय पाठिंब्यामुले आज “वारी शेतकऱ्याची” ने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. हा विजय शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि शक्तीचा आहे असे खोत म्हणाले.