वाशीनाका येथील डोंगरावरील शाळांत व्यसनमुक्ती अभियान
८ वी आणि ९ वीच्या विद्यार्थ्यानी घेतला सहभाग

मुंबई — व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक कुटुंबे उदध्वस्त झाली आहेत. व्यसनाचे प्रमाण आता शाळा, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांमध्येही वाढते आहे. निरामय हेल्थ फाउंडेशन व टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थांच्या संयुक्तपणे नुकतेच व्यसनमुक्ती अभियान राबण्यात आले. या माध्यमातून वाशीनाका येथील डोंगरावरील शाळांतील विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्तीवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेत डोंगरावर राहणाऱ्या इयत्ता ८ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विषयातील तज्ञ डॉ. रोहन बारटक्के यांनी मुलांशी संवाद साधून व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन केले. चित्रकला, जन जागृतीपर गीत, निबंध व घोषवाक्य यातून जनजागृतीही करण्यात आली, अशी माहिती निरामयच्या संचालिका डॉ. जानकी देसाई यांनी दिली.

मुंबईतील झोपडपट्ट्यात मोलमजुरी करणाऱ्या पालकांमध्ये व्यसनाचे प्रमाण आहे. योग्यवेळी मार्गदर्शन न मिळाल्याने याचा परिणाम मुलांवर होतो. वाशीनाका येथील डोंगरावरील वसाहती जवळपास असलेल्या शाळांमध्ये इयत्ता ८ वी व ९ वीच्या विद्यार्थ्यांमध्ये नुकतेच व्यसनमुक्ती अभियान राबवण्यात आले. येथील मॉडेल हायस्कुल, विनय हायस्कुल, चेंबूर वेल्फेअर, महाराष्ट्र शिक्षा निकेतन, नारायणराव आचार्य निकेतन या शाळांमध्ये व्यसनमुक्तीवर जनजागृती करण्यात आली. कार्यशाळेत मुलांनी चित्रकला, निबंध, संगीत, घोषवाक्यातून सादरीकरण केले. डॉ. बारटक्के यांनी मुलांशी थेट संवाद साधून व्यसनाबाबत त्यांच्यातील समज, गैरसमज दूर केले. काही मुलांनी कुटुंबात तसेच आजूबाजूला व्यसनाधिनतेमुळे होणारे परिणाम याबाबत चित्र काढून तसेच गीत, घोषवाक्य, निबंधातून सादरीकरण केले. डॉ. बारटक्के यांच्या अचूक संवादातून मुलांच्या प्रश्नांना उत्तरे मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी निरामय हेल्थ फाउंडेशनच्या संचालिका डॉ. जानकी देसाई व जयश्री पटवर्धन , टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टचे गणेश सोडे तसेच स्वयंसेवक व संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 

 

One thought on “वाशीनाका येथील डोंगरावरील शाळांत व्यसनमुक्ती अभियान ८ वी आणि ९ वीच्या विद्यार्थ्यानी घेतला सहभाग”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *