मतदान यंत्राबरोबर प्रथमच व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठयांद्वारे मतमोजणी  : सहारिया
नांदेड- वाघाळा मनपा निवडणुक : एका वॉर्डाची निवड
मुंबई : नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ११ ऑक्टोबर २०१७ रोजी होणाऱ्या मतदानाकरिता एका प्रभागात प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर करण्यात येणार आहे. तसेच या प्रभागात नेहमीच्या मतदान यंत्राबरोबरच व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांद्वारेदेखील मतमोजणी केली जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी बुधवारी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात एका पत्रकार परिषदेत दिली.
सहारिया यांनी सांगितले की, नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या एकूण २० पैकी चार सदस्य संख्या असलेल्या १९ प्रभागांतून सोडतीद्वारे प्रभाग क्र. २ ची व्हीव्हीपॅट वापरण्यासाठी निवड करण्यात आली आहे. या प्रभागाच्या सर्व ३७ मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटचा प्रायोगिक तत्वावर वापर केला जाईल. हा वापर प्रायोगिक व प्रथमच असल्यामुळे या प्रभागातील मतमोजणी नेहमीच्या मतदान यंत्रासह व्हीव्हीपॅटमधून प्राप्त होणाऱ्या चिठ्ठ्यांद्वारेदेखील केली जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी टप्प्याटप्प्याने व्हीव्हीपॅटचा वापर करण्यास सुरूवात करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने  दिले होते. या व्हीव्हीपॅटच्या वापराबाबतचे सर्व तांत्रिक प्रशिक्षण व त्यांची देखरेख कंपनीचे अधिकारी महानगरपालिका आयुक्तांशी सल्लामसलत करुन करणार आहेत. मतमोजणीसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या समितीची मतमोजणी प्रक्रियेवर बारकाईने नजर असेल. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर हे सर्व व्हीव्हीपॅट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया परत घेऊन जाणार आहे, असेही सहारिया यांनी सांगितले. नांदेड- वाघाळा महानगरपालिकेत एकूण २० प्रभाग आणि ८१ जागा आहेत १९ प्रभाग चार सदस्यांचे आहेत. एक प्रभाग ५ सदस्यांचा आहे. एकूण ३ लाख ९६ हजार ८७२ मतदार असून त्यांच्यासाठी ५५० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभाग क्र.२ वगळता अन्य सर्व प्रभागांतील एका मतदान केंद्रावर सरासरी ७३४ मतदार असतील. व्हीव्हीपॅटचा वापर होत असलेल्या प्रभाग क्र.2 मध्ये मतदारांची एकूण संख्या २० हजार ३०७ इतकी आहे. त्यांच्यासाठी ३७ मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. या प्रभागात एका मतदान केंद्रावर सरासरी ५५० मतदार असतील, असे ते म्हणाले.
८१ जागांसाठी ५७८ उमेदवार
एकूण ८१ जागांसाठी ८९१ उमेदवारांनी वैध नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. त्यातील ३१३ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आता ५७८ उमेदवार आहेत. व्हीव्हीपॅटचा वापर होत असलेल्या प्रभाग क्रमांक २ मध्ये २६ उमेदवार आहेत. ११ ऑक्टोबर २०१७ रोजी सकाळी ७.३०ते सायंकाळी ५.३०या वेळेत मतदान होईल. १२ ऑक्टोबर २०१७ रोजी मतमोजणी होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही सहारिया यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *