सोलापूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनात बदल करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. येत्या १५ मार्चपासून सुमारे दीड महिना विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे. या कालावधीत भाविकांना केवळ मुखदर्शन घेता येणार आहे. मुखदर्शनासाठी सकाळी ६ ते ११ अशी पाच तासांची वेळ निश्चित करण्यात आली आहे. १५ मार्चपासून हे नवीन नियम लागू होणार आहेत. सध्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी राज्य सरकारने ७३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. मंदिराच्या गर्भगृहातील काम सुरू करण्यासाठी विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद ठेवावे लागणार आहे. या संदर्भात आज मंदिर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन १५ मार्चपासून सुमारे दीड महिना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. १५ मार्चपासून भाविकांनी सकाळी ६ ते ११ या वेळेत मुखदर्शन घेता येणार आहे. याबाबत मंदिर समितीने सांगितले आहे की, दररोजचे देवाचे नित्य उपचार सुरू राहणार आहेत. या काळामध्ये विठ्ठलाच्या मूर्तीचे संरक्षण व्हावे, यासाठी बुलेटप्रूफ काचेचे आवरण बसविण्यात येणार आहे.