मुंबई : महाराष्ट्रातील भाजपाचे नेते विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आलीय. भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यानंतर या पदावर नियुक्त होणारे विनोद तावडे हे महाराष्ट्रातील दुसरे नेते ठरले आहेत. तर, या अगोदर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी भाजपा अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पद सांभाळलेलं विनोद तावडे हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर तावडे यांना शिक्षणमंत्रीपदावर बोळवण करण्यात आली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले गेले व त्यानंतर ते राज्याच्या सक्रीय राजकारणातून दूर झाल्याचे दिसून आले. त्यानंतर २०२० मध्ये राष्ट्रीयमंत्री म्हणून त्यांना भाजपाने कार्यकारिणीत स्थान दिले होते. आता त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदावर बढती देण्यात आली आहे. सध्या विनोद तावडे यांच्याकडे हरियाणा या राज्याची जबाबदारी आहे.
विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे हे दोघेही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अनुक्रमिक शिक्षण मंत्री आणि ऊर्जामंत्री होते. 2019 च्या निवडणुकीत दोघांचेही तिकिट कापण्यात आली होती. मात्र त्यानंतर तावडे आणि बावनकुळे या नेत्यांनी पक्षाचे काम करणे सोडले नाही. कालच बावनकुळे यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन राजकीय पूर्नवसन केल्यानंतर आता तावडेंवर राष्ट्रीय पातळीवरील मोठी जबाबदारी देण्यात आलीय.