कमला मीलच्या आगप्रकरणी मनपाच जबाबदार; काँग्रेसची राज्यपालांकडे तक्रार
सीबीआय चौकशी व आयुक्तांच्या निलंबनाची केली मागणी
मुंबई : कमला मीलमधील हॉटेल्सला आग लागून 14 निरपराध नागरिकांचा बळी गेलाय याला मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचार आणि आयुक्तांचा नियमबाह्य व बेकायदेशीर कारभार कारणीभूत असल्याची तक्रार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडे केली. या घटनेची चौकशी सीबीआयकडे सोपवावी आणि आयुक्तांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी विखे पाटील यांनी यावेळी केली.
मुंबई शहरातील सर्व अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम आणि तिथे सुरू असलेल्या अवैध व्यवसायांची मुंबई महानगर पालिकेला संपूर्ण माहिती आहे. तरीही त्याविरूद्ध कारवाई केली जात नाही. आग लागलेल्या दोन्ही हॉटेल्समध्ये विनापरवाना हुक्का पार्लर चालविले जात होते. त्यांच्याकडे अनधिकृत व असुरक्षित बांधकाम करण्यात आलेले होते. ही बाब अग्नीशमन विभागाच्या अहवालातही नमूद करण्यात आली आहे. महानगर पालिकेच्या भ्रष्ट, निष्क्रिय व उदासीन कारभारामुळेच कधी आग लागून तर कधी इमारत कोसळून निष्पाप मुंबईकरांना आपले प्राण गमवावे लागत आहेत, असे सांगून विरोधी पक्षनेत्यांनी मागील वर्षभरात घडलेल्या अनेक घटना राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिल्या. कमला मील व साकिनाका येथील फरसाण मार्टची आग व त्याचप्रमाणे घाटकोपर व भेंडीबाजार येथील इमारत कोसळण्याच्या चार घटनांमध्ये तब्बल 76 बळी गेले आहेत. या मृत्युंसाठी केवळ पालिकेचा भ्रष्टाचार कारणीभूत असल्याने आयुक्तांसह सर्वच दोषी अधिकाऱ्यांवर भादंविच्या 302 कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी विखे पाटील यांनी केली. या शिष्टमंडळात मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरूपम, माजी मंत्री नसीम खान, आ.प्रा. जनार्दन चांदूरकर, आ.सुनिल केदार. आ. अस्लम शेख, मुंबई महानगर पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत आदींचा प्रामुख्याने समावेश होता.