डोंबिवली : केडीएमसीचे डेांबिवली विभागीय कार्यालय म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा…अशीच स्थिती ! तर अनेकांचे वाहन पार्किंगचे ठिकाण बनलं होतं. पण याला आता चाप बसणार आहे. वरिष्ठ अधिका-यांच्या निर्देशानंतर आता पालिकेतील सुरक्षा यंत्रण सतर्क झालीय. त्यामुळे आता पालिकेत येणा-या प्रत्येक व्यक्तीची नोंदवहीत नोंद केली जाणार आहे.
केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात फ आणि ग अशी दोन प्रभाग कार्यालये आहेत. तसेच पाणी, बांधकाम, जन्म-मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी, मालमत्ता, जल व मलनिस्सारण, नागरी सुविधा केंद्र असे विभाग आहेत. नागरी सुविधा केंद्रात कर भरणे तसेच विविध दाखले दिले जातात. त्यामुळे सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत वेगवेगळ्या कामांसाठी नागरिक येत असतात. या सगळ्या मालमत्तेसह घडामोडींवर सुरक्षा रक्षकांची करडी नजर असते. सुरक्षेत काही प्रमाणात ढिलाई आल्याचे निदर्शनास येताच सुरक्षा विभागाच्या उपायुक्त पल्लवी भागवत यांनी येथील सुरक्षा विभागाला सुरक्षा कडक करण्याच्या सुचना केल्या आहेत त्यानुसारच सुरक्षा विभाग अधिकच सतर्क झालाय.
या सूचनांची गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ सुरक्षा अधिकारी किसन जाधव यांनी त्यांच्या टीमसह कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव, फोन नंबर, वाहन नंबर, स्वाक्षरीची नोंद करण्यात येत आहे. संशय वाटल्यास त्या व्यक्तीची विचारपूस देखील करण्यात येत आहे. त्याकरिता नोंदवहीत नोंदी घेतल्या जात असल्याचे अधिकारी किसन जाधव यांनी सांगितले.