” मराठीपाटी मराठीसाठी ” मोठया जल्लोषात साजरा..…
मुंबई : विद्यार्थी भारती संघटनेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘मराठीपाटी ,मराठीसाठी’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व दिमाखात विरार विभागात पार पडला. या कार्यक्रमाला विविध स्पर्धा , पुरस्कार वितरण व प्रमुख पाहुण्यांच्या भाषणांमुळे रंगत आली.
विद्यार्थी भारती संघटनेच्या राज्यध्यक्षा मंजिरी धुरी यांच्या हस्ते अनोख्या पद्धतीने या कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडलं. या कार्यक्रमाला संघटनेचे संस्थापक किशोर जगताप अर्थतज्ज्ञ एस एस यादव व पहिले भारतीय वैमानिक अमोल यादव , भारत बचाव आंदोलन चे फिरोज मिठीबोरवाला, अनघा राणे ,वृषाली विनायक , ज्योती बडेकर , मराठी भारती अध्यक्ष पूजा बडेकर, विजेता भोनकर, राकेश सुतार इत्यादी प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात सामाजिक विषयांशी निगडीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले .या पुरस्करांमध्ये सर्वोदय जात्यंत पुरस्कार , मराठी भूषण, महाराष्ट्र भूषण, विरार भूषण , पालघर भूषण इत्यादी पुरस्कार देण्यात आले असल्याचे पालघर जिल्हा अध्यक्ष हर्षल झगडे यांनी सांगितले. तसेच लावणीसम्राट आकाश तायडे यांच्या लावणी कार्यक्रम खास आकर्षण ठरले . कार्यक्रमानिम्मित घेण्यात आलेल्या पत्रलेखन , नृत्य ,कविता वाचन, छायाचित्र , चित्रकला स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले .