मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर फटकेबाजी करीत उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ‘आम्ही बोललो तर तोंड लपवण्याची वेळ येईल’ असा इशाराच शिंदे यांनी यावेळी दिला. खोके, गद्दार, रोकडे, खेकडे सगळचं मुख्यमंत्रयांनी काढीत तोफ डागली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, खोके, गद्दार हे दोनच शब्द आहेत. पण या शब्दांचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. ”आमच्यावर गद्दारीचे आणि खोक्यांचे आरोप केले जात आहे. हे आता सहनशीलतेच्या पलीकडे जात आहे. महाराष्ट्राचा महागद्दार कोण आहे, हेसुद्ध बघितलं पाहिजे. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, मतदारांशी गद्दारी केली, २५ वर्षांच्या मित्राशी गद्दारी केली, शिवसैनिकांशी गद्दारी केली ते आम्हांला गद्दार म्हणत आहेत. उलट आम्ही तर ज्यांच्यासोबत निवडून आलो त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. खेकडयाचा विषय निघाले. रोकडे बंद झाले कि खेकडे दिसायला लागले. त्यामुळे खेकडयाची वृत्ती कुणाची आहे हे दिसले अशा शब्दात मुख्यमंत्रयांनी ठाकरे यांचे नाव न घेता निशाणा साधला.
शिंदे म्हणाले, ”शासन आपल्या दारी उपक्रमातून सव्वा कोटी नागरिकांना फायदा झाला. महाविकास आघाडीत अहंकारामुळे काही प्रकल्प रखडवले होते. ते प्रकल्प युतीचे सरकार आल्यानंतर मार्गी लावले. आम्ही अॅक्शन घेतो, फिल्डवर जाऊन काम करतो, हे सरकार घरी बसून काम करणारे नाही असा टोलाही त्यांनी ठाकरे यांना लगावला.