‘कडोंम’पाचे ६५०० कोटी कधी देणार?
-राष्ट्रवादीचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आठवण

-अर्थसंकल्पावरील चर्चेत कल्याण, डोंबवलीच्या प्रश्नांना फोडली वाचा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबवली महानगरपालिकेच्या निवडणुकादरम्यान येथील पायाभूत सुविधांसाठी ६ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. मात्र त्या निधीची तरतुद यंदाच्या अर्थसंकल्पात नाही, असे सांगत जाहीर केलेल्या निधीची पुरवणी मागण्यांत तरतुद करण्याची मागणी काँग्रेसचे कल्याणचे राष्ट्रवादी आमदार जगन्नाथ शिंदे (आप्पा) यांनी केली. ते मंगळवारी विधान परिषदेतील अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलत हाेते.

आमदार शिंदे म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात ८ महानगरपालिका असुन येथील लोकसंख्येची वाढ वार्षिक ३६ टक्के आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील पायाभूत सुविधांवर मोठा ताण पडत आहे.  सन २०१८ च्या राज्य अर्थसंकल्पात ठाण्यात क्लस्टर प्रकल्प राबवण्याची घोषणा केली होती. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. ठाणे शहराचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये करण्यात आला आहे. मात्र त्याची काहीही कामे झालेली नाहीत, असे ते म्हणाले. ठाण्यात बराच काळ सेना-भाजपची सत्ता आहे. मात्र येथे कोणत्याही सुविधा झालेल्या नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

कल्याणमध्ये पूर्व, पश्चिम रस्तेे करण्याबाबत आपण सातत्याने मागणी करतो आहोत. मात्र पालिका आपल्याकडे निधी नसल्याचे कारण पुढे करत आहे. कल्याण शहराला शुद्ध पाणी मिळत नाही. तसेच येथील कचऱ्याचे नियोजन फसल्याचे ते म्हणाले. कल्याणमधील पालिका रुग्णालयात जनआरोग्य योजनांतून रुग्णावर मोफत उपचार करण्यात येत नाहीत. कारण कल्याण मधील रुग्णांलयांना निधीची मोठी चणचण भासते आहे, असे त्यांनी सांगितले.

उल्हासनगर, अंबरनाथ आणि कल्याण या शहराच्या पिण्याच्या पाणीची समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच वालधुनी नदीच्या सुधारणा प्रकल्पाचा ५२३ कोटींवरचा खर्च आता ९५५ कोटींवर पोचला असून या नदीचे पुनरुज्जिवन कधी होणार, असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला. भिवंडी ते कल्याण या रस्त्याचा टप्पा १ व २ प्रकल्प मार्गी लावावेत आणि शिळफाटा व कल्याणच्या रहिवाशांच्या वाहतुक कोंडीवर मार्ग काढण्यात यावा. त्यासाठी एमएमआरडीएला पुरेसा निधी द्यावा, अशी मागणी शिंदे यांनी आपल्या भाषणात केली.
—————

One thought on “‘कडोंम’पाचे ६५०० कोटी कधी देणार? -राष्ट्रवादीचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आठवण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!