साहित्य आणि संस्कृती टिकविण्यात मराठी माणसाचे योगदान : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वणी (अजय निक्ते ) : आपल्या साहित्यिकांनी स्वाभिमान जपला. मला अभिमान आहे की मराठी माणसाने साहित्य आणि संस्कृती टिकविण्यासाठी मोठे योगदान दिले. साहित्य संमेलनांनी सर्व प्रकारच्या विचारांना थारा दिल्याने लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेला मोठा हातभार लागला असे उदगार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काढले. विदर्भ साहित्य संघ, वणीच्या वतीने आयोजित तीन दिवस चालणाऱ्या ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्राचार्य राम शेवाळकर परिसर, वणी पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे, स्वागताध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार, केंद्रीय मंत्री हंसराज अहिर , जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, वणी येथे साहित्य संमेलन होतेय, हा आनंदाचा क्षण! या परिसराने अनेक थोर साहित्यरत्न देशाला दिले. मराठी मन हे संवेदनशील. देशाची सांस्कृतिक परंपरा सदैव जपण्याचे काम या मराठी मनाने केले. मराठी साहित्य हा कल्पनाविलास नसून त्यातून वास्तवाचे दर्शन अधिक होते. बदलत्या काळात तंत्रज्ञानाने अभिव्यक्तीची नवी दालने खुली करून दिली, त्यामुळे अभिव्यक्तीला वाव मिळतो आहे आणि ही अतिशय चांगली बाब आहे , असे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले.