मुंबई: लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंनी विधानसभेसाठी  स्वबळाचा नारा दिला आहे. कोणाशी युती होईल, किती जागा मिळतील याचा विचार करु नका. आपण विधानसभेच्या सव्वा दोनशे ते अडीचशे जागांवर लढवणार आहोत, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली.

मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा मुंबईतील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आला होता, यावेळी राज ठाकरे बोलत होते. लाडके बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. 

राज ठाकरे  म्हणाले की,  विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाकडून राज्यात सर्व्हेक्षण सुरु आहे. मध्यंतरी ४-५ जणांचं पथक जिल्हा, तालुका पातळीवर जाऊन आलं. त्यांनी प्रत्येक मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. लोकांशी, पत्रकारांशी बोलून त्यांनी तपशील गोळा केलेला आहे. आता लवकरच ते पुन्हा सर्वेक्षणासाठी जातील. तेव्हा ते पदाधिकाऱ्यांना भेटतील. त्यांना अचूक माहिती द्या, अशा सूचना राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. १ ऑगस्टपासून महाराष्ट्र दौरा करणार असल्याची घोषणा देखील राज ठाकरे यांनी केली.

निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच विधानसभेसाठी तिकीट दिलं जाईल. तिकीट मिळालं म्हणजे मी पैसे काढायला मोकळा असा विचार करणाऱ्यांना तिकीट मिळणार नाही. विधानसभा निवडणुकीनंतर मला माझ्या पदाधिकाऱ्यांना सत्तेत बसवायचं आहे आणि काहीही करुन ते मी करणारच, असा निर्धार राज यांनी व्यक्त केला. मी सत्तेत बसण्याची भाषा केल्यावर काही जण हसतील, त्यांना हसू द्या. पण यंदाच्या निवडणुकीनंतर ही गोष्ट घडणार आहे. आपण सव्वा दोनशे ते अडीचशे जागा लढवणार आहोत. त्यामुळे युतीत किती जागा मिळतील, कोणत्या जागा मिळतील, असे प्रश्न मनातून काढून टाका, असं राज ठाकरे म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!