मुंबई : महाराष्ट्रात भाजपाने 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात, असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विधानसभानिहाय मिळालेली मते आणि गेल्या विधानसभेत मिळालेली मते त्याचप्रमाणे सर्वेक्षण अहवाल याच्या आधारे विधानसभा निहाय उमेदवार निवडले जाणार आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाने ज्या जागा जिंकल्या ती जागा त्याच पक्षाकडे राहील. मात्र काही मोजक्या जागा आहेत त्यामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जागा निश्चितीचा अधिकार कोअर कमिटीच्या रविवारच्या बैठकीत देण्यात आल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रात अमित शाह यांचे विश्वासू असलेले भूपेंद्र यादव यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती. भूपेंद्र यादव सध्या महाराष्ट्रात चांगलेच सक्रिय झाले आहेत. भूपेंद्र यादव यांच्याकडून भाजपच्या विभागनिहाय मॅरेथॉन बैठका घेतल्या जाणार आहेत. ते सोमवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात एक बैठक घेणार आहेत. या बैठकीला प्रभारी भूपेंद्र यादव,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,महामंत्री संजय केनेकर,विजय चौधरी,विक्रांत पाटील,माधवी नाईक,चित्रा वाघ आणि श्रीकांत भारतीय उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील पाच महामंत्र्यांकडून विभागीय संघटनात्मक आढावा घेतला जाईल. त्याचप्रमाणे अमित शहा १६,१७,१८ तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. यासंदर्भातील देखील नियोजनाचा आढावा घेतला जाणार आहे.