ठाणे, दि. १३ (प्रतिनिधी) : गेल्या १५ दिवसांपासून एसटी कर्मचा-यांचा संप सुरू आहे अजूनही संपावर तोडगा निघू शकलेला नाही आता संपावर शिक्षकांच्या मिम्स येऊ लागल्या आहेत. त्याचे पडसाद ठाण्याच्या वसंत स्मृती गौरव सोहळयात उमटले. आमदार निरंजन डावखरे यांनी अशैक्षणिक कामे शिक्षकांवर लादली जात असल्याची टीका करीत, एस. टी. संपात शिक्षकांना ड्रायव्हर वा कंडक्टरची कामे देण्यात येणार असल्याच्या मिम्स चा उल्लेख केला. हाच धागा पकडून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शिक्षकांना केवळ विद्यादानाचे कार्यच देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने कोकणातील आदर्श शिक्षक आणि पाच संस्थाचालकांचा केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना कपिल पाटील म्हणाले की, भारतरत्न सचिन तेंडुलकर, प्रसिद्ध धावपटू कविता राऊत यांची खेळातील गती शिक्षकांनी ओळखली होती. त्याच धर्तीवर शिक्षकांनी चांगला समाज घडवित असतानाच विद्यार्थ्यांमधील गती ओळखावी. बदलत्या काळात शिक्षकांनी वेगाने बदल आत्मसात केले. अन्यथा, एका पिढीचे नुकसान झाले असते. त्याबद्दल शिक्षकांचा प्रत्येक व्यक्तीने सन्मान करावा. चांगला समाज घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. आईच्या दृष्टीकोनातूनच शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे पाहावे. त्यानंतर ट्यूशन क्लासेस हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही, असे मत कपिल पाटील यांनी व्यक्त केले. शिक्षकाने पोटार्थी न राहता स्वयंप्रकाशित व्हावे. तसेच व्यापक दृष्टीकोन ठेवावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.
डावखरेंनी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वसंत फुलविला : प्रशांत ठाकूर
महाविकास आघाडी सरकारकडून शिक्षकांकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा परिस्थितीत भाजपा शिक्षक आघाडीने शिक्षकांच्या पाठिशी राहावे, असे आवाहन आमदार केळकर यांनी केले. शैक्षणिक कामांबरोबरच शिक्षकांवर अन्य कामांचे नाहक ओझे लादण्यात येत आहे. शिक्षकांचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केले. निवडणुकीच्या कामकाजासाठी शिक्षकांऐवजी बेरोजगार तरुणांना प्राधान्य द्यावे, अशी मागणीही डावखरे यांनी केले वसंत डावखरे यांनी संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वसंत फुलविला होता. आता वसंतस्मृती पुरस्काराच्या माध्यमातून डावखरे साहेबांची स्मृती कायम राहील, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले.
कोकणातील पाच संस्थांचा गौरव ..
कोकणात उत्तम शैक्षणिक कार्य करणाऱ्या संस्थांचालकांमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर यांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर व अंजुमन ई इस्लाम संस्थेचे कार्यकारी चेअरमन बुरहान हॅरीस यांच्यावतीने प्रतिनिधीने पुरस्कार स्वीकारला. तर परशुराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विनय नातू, सॅक्रेड हार्ट स्कूलचे सेक्रेटरी अल्बिन अॅँथोनी, अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे अध्यक्ष पुष्कराज वर्तक, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे कार्याध्यक्ष बापुसाहेब हाटकर यांनी उत्कृष्ट संस्ठाचालकाचा पुरस्कार स्विकारला. या वेळी कोकणातील १३० गुणवंत शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.