वसंत मोरे यांचा शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश
मुंबई, दि. ८ः लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने देशाला एक दिशा दाखवली. लोकशाही आणि संविधान धोक्यात आले होते. ती लढाई संविधानाच्या आणि लोकशाहीच्या रक्षणाची होती. आता गद्दारी, खोकेबाजी आणि लाचारीच्या विरुद्धची लढाई होणार आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची ही लढाई असून पुणे हे सत्ताबदलाचे केंद्र असले पाहिजे, असे सांगत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवणारे आणि पूर्वी मनसेत असलेल्या वसंत मोरे यांनी मंगळवारी मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला. १७ शाखाध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष, एका शहाराध्यक्षासह शेकडो कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केला. ठाकरेंनी स्वगृही परतलेल्या सर्व शिवसैनिकांचे स्वागत केले. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर यावेळी उपस्थित होते.
सर्व जुन्या शिवसैनिकांचे मनापासून स्वागत करताना, शिवबंधन बांधत असताना काहीजण म्हणाले आम्ही पहिले शिवसैनिक होतो. आता तुम्हाला सगळ्यांना शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा झाली पाहिजे. ती शिक्षा म्हणजे पुण्यात शिवसेना वाढवून पाहिजे. जबाबदारी म्हणून ही शिक्षा घ्या. पुण्यात एकेकाळी शिवसेनेचे आपले पाच आमदार होते. तो काळ मला पुन्हा आणायचा आहे. आता पुणे पूर्णपणे शिवसेना आणि भगवामय करायचे आहे. तो भगवा तुम्ही सगळे मिळून तिकडे फडकवाल, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत संविधानाच्या आणि लोकशाहीच्या बाजूने उभे राहून महाराष्ट्राने देशाला एक दिशा दाखवली. आता जी लढाई होणार आहे ती गद्दारी, खोकेबाजी आणि लाचारीच्या विरुद्धची लढाई होणार आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची ही लढाई असून पुणे हे उद्याच्या सत्ता बदलाचे केंद्र असले पाहिजे. त्यामुळे सत्ता बदलाची सुरुवात पुण्यातूनच झाली पाहिजे, असा सूचनावजा आदेशच ठाकरे यांनी दिला. दरम्यान, जोरदार घोषणा देत, मातोश्रीचा परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला.
पुण्यात ताकद वाढवू – वसंत मोरे
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वसंत मोरे यांनी, १९९२ पासून शिवसेनेत होतो. मी मूळ शिवसैनिक आहे. मध्यंतरी दुसऱ्या पक्षात गेलो होतो. आता स्वगृही परतले आहेत. माझ्यासोबत आलेल्या शकोडो कार्यकर्ते यांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे शिवसेनेत काम करणार आहे. पुणे जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा वाढवू, असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला.
पुण्यात ताकद वाढणार – संजय राऊत शिवसैनिक असलेल्या मोरेंनी लोकसभा निवडणूक लढवली आणि अखेर त्यांनी मातोश्री आणि शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत येतील, अशी आमची खात्री होती. आता ते शिवसेनेत आल्याने पुणे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद नक्कीच वाढेल, असा दावा संजय राऊत यांनी केला.