वसंतराव डावखरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
ठाणे : विधानपरिषदेचे माजी उपसभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव डावखरे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी संध्याकाळी ठाणे येथील जवाहरबाग स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आल. त्यांचे पुत्र प्रबोध आणि आमदार निरंजन डावखरे यांनी विधिवत त्यांच्या पार्थिवास अग्नी दिला. यावेळी पोलीस दलातील जवानांनी हवेत गोळीबाराच्या फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना दिली.
शुक्रवारी सकाळी स्व. वसंतराव डावखरे यांचे पार्थिव ठाणे पूर्व हरिनिवास परिसरातील गिरीराज हाईट्स येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, ठाणे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड, हेमंत टाकले, महेश तपासे विश्वजीत कदम, प्रमोद हिंदुराव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे राजशिष्टाचार विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयास कळविण्यात आले होते त्यानुसारच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी, राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, ठाण्यातील व मुंबईतील त्यांचे अनेक हितचिंतक, मित्र यांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.
मान्यवरांकडून स्व वसंतराव डावखरेंच्या आठवणींना उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वसंतराव डावखरे हे अजातशत्रू आणि जगन्मित्र होते, त्यांच्या जाण्याने मोठी हानी झाली आहे. ते सभागृहातील कामकाज अतिशय कुशलतेने चालवीत. स्वत:च्या मनातील दु:ख त्यांनी कधी व्यक्त केले नाही मात्र कायम हसऱ्या चेहऱ्याने राहिले. मी त्यांना अनेक वर्षे अगदी जवळून पाहिले असून त्यांच्याविषयी माझ्या खूप आठवणी आहेत अशी भावना मुख्यमत्रयानी व्यक्त केली.
विधानपरिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले कि वसंतरावांचे सर्वपक्षीय संबंध होते आणि ते सदस्यांमध्ये लोकप्रियही होते. त्यांचे कार्यालय सर्वांनाच हक्काचे वाटत असे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि त्यांच्याविषयी बोलतांना शब्द अपुरे पडतील असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. ते ठाण्याच्या विकासात नेहमीच मदत करीत राहिले.
स्व. डावखरे यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम १३ जानेवारीस शिरूर तालुक्यातील हिवरे गावी असल्यचे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या भाषणात जाहीर केले.