मुंबई : लोकसभा निवडणूकीत सपाटून मार खाणारी वंचित बहुजन आघाडी ॲक्शन मोडवर आली आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत आगामी विधानसभा निवडणूकीची तयारी म्हणून वंचितने बुधवारपासून (ता.२६) इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविण्यास सुरुवात केली आहे. २६ जुलै पर्यंत हे अर्ज स्विकारले जाणार आहेत.
वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत ३८ जागा लढविल्या होत्या आणि १५ लाखांहून अधिक मते मिळवली होती. आता महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर निवडणूकीची तयारी करताना वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. कार्यकर्त्यांनी केलेल्या शिफारशीनुसार निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांकडून अर्ज मागविण्याचा निर्णय पक्षाने घेतला. तसेच, अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेत कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून त्यांचे मत जाणून घेणार आहे. पक्षाने त्यांच्या एक्स हँडलवर गुगल फॉर्मसाठी ऑनलाईन लिंक पोस्ट केली आहे. यामध्ये काही प्रश्न विचारण्यात आले असून अर्जदारांना त्यांचा वैयक्तिक तपशील, त्यांच्या पसंतीचा विधानसभा मतदारसंघ आणि वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी का द्यावी, तसेच इच्छुकांना समाजासाठी दिलेल्या ५ योगदानाची माहिती देण्यास सांगितले आहे.