व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने, गुलाबाच्या फुलाने फारच भाव खाल्ला ..
तरुण मुल मुलीं पासून ते अगदी कॉर्पोरेट ऑफिस मध्येही ‘व्हॅलेंटाईन वीक’ मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. त्यासाठी मोठ्या प्रमाणवर भेटवस्तूंचीही खरेदी झाली. ‘व्हॅलेंटाईन डे’ यासाठी सगळ्या शहरांमध्ये गिफ्टसची दुकाने, केकची दुकाने, हॉटेल्स सगळेचजणही सज्ज झाले आहेत. मात्र हे सगळे असलेतरी प्यार का इजहार वगैरे करण्यासाठी गुलाबाच्या फुलाशिवाय काही पर्याय नाही आणि हाच गुलाब फार भाव खाल्ला असून एका फुलाची किंमत हि १०० रुपये आहे आणि असे असले तरी म्हणतात ना की प्रेमाला मोल नाही. त्याप्रमाणेच भाव वाढला तरी मागणी कायम आहे.
ज्या दिवसाची युवक-युवती वर्षभर वाट पाहत असतात, व्हॅलेंटाईन डे’ च्या मुहुर्तावर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या लाल गुलाबाच्या विक्रीसाठी फुलांचा बाजार सजला होता. यंदा गतवर्षीच्या तुलनेत गुलाबाच्या दरात ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या प्रेमदिवसाच्या निमित्ताने तरुणांपासून वृद्धांपर्यंत भेटवस्तूंच्या दुकानात झुंबड उडाल्याचे पहायला मिळत आहे. बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असतानाच संकेतस्थळावर खरेदीसाठी ग्राहकांची स्पर्धा सुरु आहे. संकेतस्थळावर कपडे, भेटवस्तूंबरोबर फुलांची खरेदीही करण्यात येत आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने गुलाबांच्या फुलांवर तीस ते चाळीस टक्के सवलत देण्यात येत आहे. वेगवेगळ्या रंगांच्या कागदात गुंडाळलेले आणि विशिष्ट पद्धतीने सजवलेले गुच्छ ऑनलाइन उपलब्ध आहेत. अगदी ७०० रुपयांपासून ते ४०,००० रुपयांपर्यंत या गुच्छांची किंमत आहे.
टॉप सिक्रेट व डच गुलाबाच्या फुलांची मागणी वाढली
व्हॅलेंटाईन्स डे’जवळ आल्याने बाजारपेठेतील गुलाब फुलांची आवाक मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. मात्र गुलाबांच्या फुलांच्या दरात दरवर्षीच चढ उतार होत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. लाल रंग असणाऱ्या चायना जातीच्या २० गुलाबांचा गुच्छाची किंमत ८० रुपये आहे तर गुलाबी रंगांच्या चायना जातीच्या २० गुलाबांच्या गुच्छाची किंमत ५० रुपये आहे. भारतीय जातीच्या ६ गुलाबांचा गुच्छाची किंमत ३० रुपये आहे. एकंदरीतच १० ते १५ रुपयांपासून गुलाबांच्या गुणवत्तेनुसार गुलाबांची किंमत असते. टॉप सिक्रेट आणि डच यासारख्या जातीच्या गुलाबांची मागणी सध्या बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे, ती मात्र १०० रुपयां पर्यंत पोहचली असल्याचे फुलविक्रेत्यांचे म्हणणे आहे. (श्रुती देशपांडे ़-नानल, प्रतिनिधी)