मुंबई : मुंबई आंदण नाही तर लढवून मिळवली आहे. महाराष्ट्रापासून जो कुणी मुंबई तोडेल त्याचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. पण मुंबई तोडता येत नाही, म्हणून मुंबईची हत्या करण्याचा मनसुबा आहे. इथले उद्योग राज्याबाहेर न्यायचे. मुंबईतून सर्वात जास्त महसूल येतो. तेथील धागेदोरे कापायचे हा डाव असून मुंबईच्या ठेवींवरही यांचा डोळा आहे. मुंबई महाराष्ट्राची लुट भांडवलदारी वृत्ती करते आहे आणि मिंधे बघताहेत अशा शब्दात ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर वज्रमुठ सभेतून टीकेचे बाण सोडले.
महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडली त्यावेळी उध्दव ठाकरे बोलत होते. याप्रसंगी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, नेते बाळासाहेब थोरात, भाई जगताप, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
उध्दव ठाकरे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी सूरत लुटली हेाती ती इंग्रजांची वखार लुटली होती इंग्रजांच्या वखारी स्वराज्यासाठी लुटली होती. पण त्याहीपेक्षा भयानक मुंबई, महाराष्ट्राची लूट ही भांडवलदारी वृत्तीचे सरकार करतेय. आणि आपले मिंधे.. हे बाळासाहेबांचे विचार ? कसले बाळासाहेबांचे विचार ? जर बाळासाहेबांचे विचार एक कण धमण्यात असता तर तू गद्दारी केली नसती आणि गद्दारी केल्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्राची अवलेहना सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठी भाषा सक्तीची केली होती. या सरकारने तीच भाषा मिंध्यांनी ऐच्छिक केली,हीच जर तुमची वृत्ती असेल तर काय बाळासाहेबांचे विचार तुम्ही अंगिकारता. तुम्हीच मराठी भाषेचे धिंडवडे काढत असाल तर अभिजात करणार कोण ? कुठे आहेत बाळासाहेबांचे विचार ? बाळासाहेबांचे विचार तुमच्यात असते, तर गद्दारी केलीच नसती असेही ठाकरे म्हणाले.
उध्दव ठाकरे यांनी गौतम अदानी यांच्याविषयी भूमिका स्पष्ट केली. गौतम अदानी यांच्याबाबतीत चौकशी झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे? तुमचं काय मत आहे? तुमच्यापर्यंत विषय पोहोचलाय. माझं वेगळं मत आहे. अदानींची चौकशी करुच नका. कारण आपल्या देशाची लोकसंख्या एवढी मोठी आहे, एक माणूस मेहनत करुन एवढ्या वरती जात असेल तर त्यांचं संपूर्ण आत्मचरित्र माझ्या शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात लावा की, श्रीमंत कसं व्हायचं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
जमीन काय असते ते अमित शाहांना दाखवू : उध्दव ठाकरेंचे आव्हान
वज्रमुठीचा हिसका तुम्ही पाहिला असेल. कसब्याची निवडणूक, मार्केट कमिटीची निवडणूक असेल, विधान परिषदेची निवडणूक असेल किंवा अंधेरीची निवडणूक असेल मविआच्या वज्रमुठीच्या ताकदीनं विजय मिळाला आहे. महापालिकेच्या निवडणुका लावा, जिल्हा परिषदेच्या लावा, लोकसभेच्या लावा किंवा तीन निवडणुका एकत्र लावा, मविआच्या वज्रमुठीचा ठोसा लावू, असं उद्धव ठाकरे म्हणाले. जमीन काय असते ते अमित शाहांना दाखवू, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी शहांना दिलं. चीन देशाचा भूगोल बदलत आहे, राज्यकर्ते देशाचा इतिहास बदलत आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या शिवसैनिकाच्या घरी ईडी सीबीआयवाले पोहोचत आहेत. ईडीवाले चीनला पाठवून बघा परत येतात का, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.२०१४ साली अच्छे दिन येणार म्हणून सांगितलं होत आले का अच्छे दिन, हजारो किंवा कोट्यवधी नोकऱ्या देणार होते मिळाल्या का नोकऱ्या, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
टीनपाटावर बूच घाला…राणे कुटूंबियांवर टीका
उध्दव ठाकरे यांनी राणे कुटूंबियांचे नाव न घेता जोरदार टीका केली. कर्नाटक निवडणुकीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, काँग्रेसने मला ९१ वेळा शिव्या दिल्या’. मी शिव्या देण्याचे समर्थन करत नाही. मग तुमचे टीनपाट मला, आदित्य आणि कुटुंबाला शिव्या देतात, तेव्हा का बोलत नाही. तुमच्या टीनपाटावर बूच घाला. तुमची लोक वाटेल ते बोलणार, मग आमची लोक पण बोलणार, रोज काहीही बोलणार आम्ही ऐकून घेणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. मुंबईतील बीकेसीची सोन्यासारखी जागा बुलेटट्रेनच्या घशात घातली. तिथे आपण कोरोना सेंटर उभारले होते. कुणासाठी बुलेट ट्रेन करताय. आरे कारशेडला मी स्थगिती दिली होती. कांजूरचा पर्याय सुचवला होता. पण केंद्र सरकार कोर्टात गेले. केंद्र आणि राज्य सरकार जनतेच्या सेवेसाठी बांधिल असतात पण ते कोर्टात गेले आणि अडवणूक केली असेही ठाकरे म्हणाले.
६ मे ला बारसूत जाणार …नारायण राणेंना ठाकरेंचे आव्हान
उद्धव ठाकरे म्हणाले, बारसूत माझ्या नावानं पत्र दाखवतायेत, उद्धव ठाकरेंनी ही जागा सूचवली होती. माझ्या पत्रात तिथं पोलिसांना घुसवा, लाठ्या मारा, अश्रूधूर सोडा, असं लिहिलंय का ? बारसूत जर पत्र मी दिलं होतं, म्हणून स्वत:चं बारसं करणार असाल, तर मग पालघर आदिवासींच्या घरात पोलीस का घुसवलं. बारसू काय पाकव्याप्त काश्मिर आहे का ? ६ मे ला बारसूत जाणार असेही ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. आमचं हिंदुत्त्व गोमूत्रधारी नाही, आमचं हिंदुत्त्व राष्ट्रीयत्व आहे असेही ठाकरे म्हणाले.
अजित पवारांनी वाचला मुख्यमंत्रयांचा चुकीचा पाढा
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही तडाखेबाज भाषण केले. पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चुकीचा पाढा वाचला. पवार म्हणाले की, इतक्यांदा चुकणारा मुख्यमंत्री मी पाहिला नाही. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना ते पंतप्रधान म्हणतात, निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यातला फरक मुख्यमंत्र्यांना कळत नाही. शिवाय ‘साडेतीनशे पन्नास किलोमीटर’ मेट्रो असं म्हणाले. परंतु साडेतीनशे पन्नास, हा काय प्रकार आहे ? असा सवाल पवारांनी उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाने या शिंदे-फडणवीस सरकारला नपूंसक म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाने देशातील इतर कोणत्या राज्य सरकारला नपुंसक म्हटलंय का ? याचीही यांना जनाची नाही, मनाची लाज वाटत नाही. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का ? हा महाराष्ट्राचा कमीपणा नाही का ? आपण शेवटी सर्वजण महाराष्ट्रीयन आहोत. आपलीही अशा गोष्टींमुळे शरमेने मान खाली जाते. परंतू नैतिकदृष्ट्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना याबद्दल काही वाटत नाही. हे घोटाळा करुन सत्तेत आले आहेत, त्यामुळे बोलतानाही त्यांचा घोटाळा होतो. हे सरकार दगा-फटका देऊन सत्तेत आहे त्यामुळे जनता यांना धडा शिकवणार असे पवार म्हणाले.
जनताच सत्तेवरून खाली खेचतील :- नाना पटोले
मविआला मिळणारा प्रतिसाद पाहून सत्ताधारी पक्षाला भिती बसली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत शिंदे गट व भाजपाचा धुव्वा उडाला व शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त केला. मागील तीन वर्षात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा दारूण पराभव होत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाहीत असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
खारघर मध्ये सरकारने हत्याकांड घडवले पण अजून एकही गुन्हा नोंद केलेला नाही आणि कसलीही कारवाई झालेली नाही. तर बारसूमध्ये जनतेवर अत्याचार करत आहेत. बारसूचा रिफायनरी प्रकल्प हा कोकणच्या विकासासाठी नाही तर सरकारच्या बगलबच्च्यांच्या विकासासाठी आहे हे उघड झालेले आहे. आज जर सरकारने निवडणुका लावल्या तर त्यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय ही जनता गप्प बसणार नाही असे पटोले म्हणाले.
भाजपचा पालिकेच्या ९२ हजार कोटींच्या ठेवींवर डोळा : अशोक चव्हाण
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, मविआने एकत्र राहून निवडणुका लढविल्या तर सत्ताधारी पक्षाचा पराभव होतो हे मागील काही निवडणुकांवरून दिसले आहे. विधानपरिषद, अंधेरी, कसबा पोटनिवडणुकीत व बाजार समिती निवडणुका जिंकून मविआने हॅटट्रिक केली आहे . आता मुंबईसह इतर महानगरपालिका, नगरपालिका, विधानसभा लोकसभा निवडणुका जिंकून आपल्याला षटकार मारायचा आहे. जनता आसाराम गयारामांना स्थान देत नाही. भाजपाला मंबई महानगरपालिकेवर सत्ता हवी आहे पण ती मुंबईकरांच्या विकासासाठी नाही तर त्यांचा डोळा हा मुंबई महापालिकेतील ९२ हजार कोटींच्या ठेवींवर असल्याने भाजपला सत्ता हवी आहे. भाजपा सतत हे डबल इंजिन सरकार म्हणत आहे. पण डबल इंजिनची गरज कमकुवत असणाऱ्यांना लागते. हे डबल इंजिन भरकटलेले आहे अशी टीका चव्हाण यांनी केली.
हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार – आदित्य ठाकरे
या सरकारचा थोड्या दिवसांचा खेळ आहे, हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार असा शब्दात युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला. “हे अवकाळी सरकार आहे. शेतकऱ्यांचे ऐकायला एक मंत्री नाही. गुजरात आणि महाराष्ट्र एक दिवस स्थापना झाली. पण गुजरात दोन मुख्यमंत्री मिळाले आहेत. शिवसेनेनं ज्यांना मोठं केलं, ते साथ सोडून गेले. पण तुम्ही सोबत राहिलात. तुमचे मनापासून आभार मानतो,” असंही आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, खासदार संजय राऊत, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, आमदार जितेंद्र आव्हाड यांचीही भाषणे झाली.