ठाणे, दि १६ ऑक्टोबर : लसीकरण करुन घेणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सदयस्थितीत ‍ कोविड १९ चा सामना करण्यासाठी लस हा एकमेव उपाय आहे, तरी लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवा येथे आयोजित केलेल्या लस महोत्सवादरम्यान केले. या महोत्सवादरम्यान तब्बल २७०० नागरिकांनी आपले लसीकरण करुन घेतल्याबददल शिंदे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आज कळवा परिसरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा “महालसमहोत्सव’’ आयोजित करण्यात आला होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंद व महापौर नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. सध्यस्थितीत कोव्हीड-१९ चा सामना करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्राधान्याने पूर्ण करणे गरजेचे असून ठाणे महापालिकेच्यावतीने या लसमहोत्सवाचे शिस्तबद्ध नियोजन केल्याबद्दल स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे

यावेळी कल्याण जिल्‍हाप्रमुख गोपाळ लांडगे, उप महापौर सौ.पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती प्रियांका पाटील, स्थानिक नगरसेवक उमेश पाटील, गणेश कांबळे, नगरसेविका विजया लासे, अनिता गौरी, मंगल कळंबे, पूजा करसुळे, स्वीकृत नगरसेवक राजेंद्र साप्ते, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, माजी नगरसेवक बालाजी काकडे, उपआयुक्त मनीष जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव जाधव, शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, कोरोना जरी आटोक्यात येत असला तरी तो पूर्णपणे संपलेला नाही. आतकोनेश्वर नगर, कोनपाडा, भास्कर नगर, आनंदविहार परिसर या ठिकाणच्या नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी येथे पहिला डोस घेतलेल्यांसाठी दुसरा डोस व ज्यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही यासाठी हा लसमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी या लसमहोत्सवास सहकार्य केल्याबददल खासदार शिंदे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी शहरात १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य महापालिकेने ठेवले असून त्याचाच एक भाग म्हणून आज एकाच वेळी महालसमहोत्सवाचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. कळवा परिसरात कष्टकरी, कामगार वर्गाची संख्या जास्त असून त्यांना या महोत्सवाचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. महापालिकेच्या लसीकरण मोहिमेत समाजातील सर्व घटकांना सामावून घेतले जात असून लवकरच शहर कोरोनामुक्त होईल असा विश्वास महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. महोत्सवामध्ये ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील २१ डॉक्टर्स, १३४ नर्सेस तसेच ९० डेटा एन्ट्री ऑपरेटर व पेशंट निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने अत्यंत नियोजनबद्ध लस उपलब्ध करून दिल्याबद्दल समस्त कळवावासीयांनी समाधान व्यक्त करत पालिका प्रशासनाचे आभार मानले.

………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!