ठाणे दि.२८: ग्रामीण भागातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. सध्या ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र तसेच गावस्तरावर कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. तथापि दुर्गम गावातील,पाड्यातील नागरिकांचे लसीकरण जलदगतीने होणेसाठी आज जिल्हा परिषदेच्या प्रांगणात हिरवा झेंडा दाखवून तीन लस वाहिका ग्रामीण भागात मार्गस्थ करण्यात आल्या.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, राज्य हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, आरोग्य व बांधकामसमिती सभापती वंदना भांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीष रेंघे, जिल्हा परिषदेचे सदस्य , अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
ठाणे ग्रामीण भागात आतापर्यंत ९ लाख ३ हजार ६१२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून त्यामध्ये ६ लाख ८७ हजार ४१ नागरिकांचा पहिला डोस तर, २ लाख १६ हजार ५७१ नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. इतर लाभार्थी नागरिकांचेही लवकरात लवकर लसीकरण व्हावे यासाठी शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यातील १११ गावे प्राधान्याने निवडण्यात आले आहे. या गावांमध्ये ही लस वाहिका फिरणार आहे. या माध्यमातून नागरिकांचे त्यांच्या घराजवळ लसीकरण होणार आहे.