मुंबई / ठाणे : कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या गुरुवार दिनांक १२ ऑगस्ट २०२१ तसेच शुक्रवार दिनांक १३ ऑगस्ट २०२१ असे दोन दिवस लसीकरण बंद राहणार आहे. तर ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत १२ ऑगस्ट रोजी लसीकरण बंद राहणार आहे. एकिकडे दोन लस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकलमध्ये प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे तर दुसरीकडे लसच उपलब्ध हेात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहेण्
१२ ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत लससाठा प्राप्त होणार असून त्याचे वितरण शुक्रवार दिनांक १३ ऑगस्ट २०२१ रोजी मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांना करण्यात येईल. त्यामुळे शनिवार, दिनांक १४ ऑगस्ट २०२१ रोजी लसीकरण पुन्हा सुरु होईल असे पालिकेने कळविले आहे. लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.