मुंबई : ‘रेबिजमुक्त मुंबई’ करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जागतिक रेबिज दिनाचे औचित्य साधत दिनांक २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ६ प्रशासकीय विभागात रेबिज लसीकरण मोहीम राबविण्यात आली. दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, पवई, कांजूरमार्ग, भांडुप, नाहूर आणि मुलुंड या दाट लोकवस्तीच्या परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण १४ हजार १९१ भटक्या प्राण्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यात ९ हजार ४९३ भटके श्वान आणि ४ हजार ६९८ भटक्या मांजरांचा समावेश आहे.

भटक्या प्राण्यांना रेबिज या रोगाची लागण होऊ नये तसेच त्यापासून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांना रेबिजची लस देणे गरजेचे असते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भटक्या प्राण्यांचे लसीकरण करण्याचा उपक्रम आधीपासूनच सुरू आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने जागतिक रेबिज दिनाचे औचित्य साधत दिनांक २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याच्या वतीने ६ प्रशासकीय विभागात रेबिज लसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्यात आर उत्तर, आर मध्य, आर दक्षिण, पी उत्तर, एस आणि टी या सहा विभागांचा समावेश आहे.

दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, पवई, कांजूरमार्ग, भांडुप, नाहूर आणि मुलुंड या परिसरात राबविण्यात आलेल्या मोहिमेत ९ हजार ४९३ भटक्या श्वानांचे व ४ हजार ६९८ भटक्या मांजरांचे असे एकूण १४ हजार १९१ भटक्या प्राण्यांचे लसीकरण करण्यात आले.

दिनांक २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दररोज सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत रेबिज लसीकरण मोहीम राबविण्यात आली. लसीकरण मोहिमेसाठी एकूण १५ पथके तैनात करण्यात आली होती. त्यात हाताने प्राणी पकडणाऱ्या १० पथकांचा तर जाळीने प्राणी पकडणाऱ्या ५ पथकांचा अंतर्भाव होता. या प्रत्येक पथकात एक लसटोचक, एक माहिती संकलक आणि पशू कल्याण संस्थेचा एक प्राणी हाताळणीस स्वयंसेवक यांचा समावेश होता.

पाळीव श्वानांचे लसीकरण करावे, नोंदणी करून परवाना प्राप्त करावा-

मुंबईतील नागरिकांनी त्यांचेकडे असलेल्या पाळीव श्वानाचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. तसेच पाळीव श्वानाची नोंदणी केली नसेल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ https://portal.mcgm.gov.in यावर भेट देवून नोंदणी करून पाळीव श्वान परवाना प्राप्त करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!