मुंबई : कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत नागरिकांना दोन्ही डोस देवून अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने विशेष सत्र राबविण्यात येत आहेत. त्या दृष्टीने पुढील नियोजन करुन प्रशासकीय व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात येत आहे. या कारणाने मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर उद्या शुक्रवार दिनांक १० सप्टेंबर २०२१ रोजी कोविड लसीकरण बंद राहणार आहे. दरम्यान, महानगरपालिकेकडे कोविड लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. शनिवार, दिनांक ११ सप्टेंबर २०२१ रोजी लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहणार आहे.
कोविड लसीच्या दोन्ही मात्रा देवून जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राइव्ह इन लसीकरण, अंथरुणास खिळलेल्या व्यक्तिंचे त्यांच्या घरी जावून लसीकरण, एलजीबीटी समुदायातील नागरिकांसाठी विशेष लसीकरण केंद्र, दुसरी मात्रा देय असलेल्या नागरिकांसाठी एक संपूर्ण दिवस विशेष सत्र असे विविध उपक्रम राबवताना सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचून कोविड लसीकरण मोहीम वेगाने राबविली जात आहे. फक्त महिलांसाठी विशेष कोविड लसीकरण सत्र राबविण्याचे देखील विचाराधीन आहे. येत्या काळातील अशा विशेष लसीकरण मोहिमांचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक बाबींची पूर्तता करणे आणि सर्व संबंधित लसीकरण केंद्रांना आवश्यक सूचना देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे उद्या शुक्रवार दिनांक १० सप्टेंबर २०२१ रोजी कोविड लसीकरण बंद राहणार आहे. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
कल्याण डोंबिवलीत ५ दिवस बंद राहणार
संपूर्ण राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांनी सणासुदीच्या काळात लसीकरणासाठी घराबाहेर पडल्यावर त्यांची गैरसोय होवू नये यासाठी दि *10,11,14 ,16 व 19 सप्टेंबर 2021 रोजी कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रात महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर कोविड लसीकरणाची सुविधा बंद राहील,असे पालिकेने कळवले आहे.