उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाईंचे नाव ! मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई :  जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्या‍पीठाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असा नामविस्तार करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार याबाबतचा अध्यादेश काढण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार करून या विद्यापीठास थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी विविध संघटना, लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी शासनाकडे केली होती. लोकभावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी 22 मार्च 2018 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतची घोषणा केली होती. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामविस्ताराचा अध्यादेश काढण्यास मान्यता देण्यात आली. या अध्यादेशानुसार हे विद्यापीठ येत्या 11 ऑगस्ट या बहिणाबाईंच्या जन्मदिनापासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव या नव्या नावाने ओळखले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-२०१६ मधील अनुसूचीच्या भाग-१ मधील अनुक्रमांक 8 मध्ये तशी सुधारणा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणेविद्यापीठाचा नामविस्तार करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-2016 मध्ये दुरुस्ती करण्यासाठी विधानमंडळासमोर सादर करावयाच्याअध्यादेशाच्या मसुद्यासही मान्यता देण्यात आली.
**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *