मुंबई : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार गटानेही राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा ठोकल्याने पवार विरूध्द पवार असा सामना रंगल्याचे दिसून येत आहे. अजित पवार शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स झळकत आहेत. या बॅनर्सवर शरद पवारांचेही फोटो आहेत. यामुळे संतापलेल्या शरद पवारांनी अजित पवारांच्या गटाला परवानगीशिवाय फोटो वापरण्यास मनाई केली आहे. माझा फोटो परवानगीनेच वापरण्या यावा अशी तंबी अजित पवार गटाला दिला आहे.
पक्षातून बंडखोरी केल्यानंतर अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. बंडखोरी केल्यानंतर अजित पवारांनी आतापर्यंत अनेकदा आपले नेते शरद पवारच असल्याचे स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर त्यांच्या समर्थक आमदारांनीही शरद पवार हेच नेते असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र शरद पवार यांनी फोटो लावल्यावरून अजित पवार गटाला चांगलेच खडसावले आहे. माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरण्यात यावा. मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, त्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. याऊलट ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझे आता वैचारिक मतभेद आहेत. त्यांनी यापुढे माझ्या परवानगीनेच माझा फोटा वापरावा. त्या पक्षानेच माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझ्या परवानगीशिवाय फोटो वापरू नये, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.