मुंबई : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पक्षात भाकरी फिरविण्याची गरज असल्याचे सांगितले होते. आता भाजपकडूनही जिल्हा स्तरावर मोठे फेरबदल करण्यात येणार असून जिल्हाध्यक्ष बदलण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला तर काँग्रेसला घवघवीत यश मिळालं. कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्रीमंडळ कर्नाटकात तळ ठोकून असतानाही भाजपला सत्ता मिळविता आली नाही. कर्नाटक निकालानंतर काँग्रेस कार्यकत्यांबरोबरच सर्वच विरोधी पक्षांचे बळ वाढले आहे. भाजपकडून पराभवाचे मंथन सुरू असले तरी एका राज्याच्या निकालाचा इतर निवडणुकीवर फारसा फरक पडणार नाही असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.
आगामी लोकसभा विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधीही होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून कंबर कसली आहे. सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी आणि पक्ष बांधणीसाठी वेगाने हालचाली करत आहे. त्यामुळे भाजप देखील प्रदेश भाजपच्या जिल्हा स्तरावर मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. राज्यातील भाजपचे ८० टक्क्यांपेक्षा जास्त जिल्हाध्यक्ष बदलले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच राज्यातील २५ पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये भाजप नवीन अध्यक्ष नेमले जाणार आहेत. त्यासाठी भाजपची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. प्रदेश भाजपच्या जिल्हा स्तरावरील बदलांबाबत चर्चा करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप कोअर ग्रुपची आज बैठक होणार आहे.