नवी दिल्ली, १६ डिसेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सूरत विमानतळ हा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून जाहीर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
सूरत विमानतळ केवळ आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी एक प्रवेशद्वार बनणार नाही तर समृद्ध होत असलेल्या हिरे आणि कापड उद्योगांसाठी सातत्यपूर्ण आयात-निर्यात परिचालनासाठी सुविधा उपलब्ध करेल. या धोरणात्मक निर्णयामुळे सूरतच्या अभूतपूर्व आर्थिक क्षमतेला वाव मिळेल आणि आंतरराष्ट्रीय हवाई परिदृश्यात सूरत एक प्रमुख स्थान बनेल तसेच या भागाच्या समृद्धीचा एक नवा अध्याय सुरू होईल. अतिशय झपाट्याने विकसित होत असलेल्या सूरत शहराने आपल्या उल्लेखनीय आर्थिक सामर्थ्याचे आणि औद्योगिक विकासाचे दर्शन घडवले आहे.
सूरत विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देणे हे आर्थिक विकास वाढवण्यासाठी, परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि राजनैतिक संबंधांना बळकट करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे . प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक परिचालनात वाढ झाल्याने, विमानतळाचा आंतरराष्ट्रीय दर्जा प्रादेशिक विकासासाठी महत्त्वपूर्ण चालना देईल.