नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. समाजाच्या प्रत्येक वर्गाला ताकद देणारा तसेच देशाच्या गावागावातील गरीब शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर आणणारा हा अर्थसंकल्प आहे. गेल्या 10 वर्षांत 25 कोटी लोक द्रारिद्रय रेषेखालून बाहेर पडले आहेत. हा अर्थसंकल्प नव्या मध्यमवर्गीयांच्या सक्षमीकरणाचा आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“या अर्थसंकल्पातून नवीन तरुणांना मोठी संधी निर्माण होणार आहेत. या अर्थसंकल्पामुळे शिक्षण आणि कौशल्याला एक नवीन ताकद मिळणार आहे. आदिवासी समाज, दलित-मागास वर्गाला सशक्त करण्याच्या योजना या अर्थसंकल्पात आहेत. महिलांचा आर्थिक सहभाग सुनिश्चित करण्यास मदत होणार आहे. या अर्थसंकल्पामुळे छोटे व्यापारी, लघु उद्योग यांच्या प्रगतीचा नवा मार्ग उपलब्ध होणार आहे. या अर्थसंकल्पात उत्पादन आणि पायाभूत सुविधांवरही भर देण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक विकासाला नवीन चालना प्राप्त होईल. तसेच ती टिकूनही राहिल”, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.

“रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करणं ही आमच्या सरकारची ओळख राहिली आहे. आजच्या अर्थसंकल्पामुळे त्याला अधिक मजबुती मिळाली आहे. सरकारने एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्हची घोषणा केली आहे. यातून आयुष्यात पहिल्यांदाच नोकरी मिळवणाऱ्या युवकांचा पहिला पगार आमचं सरकार देईल. कौशल्य विकास आणि उच्च शिक्षणासाठी मदत व्हावी यासाठी एक कोटी युवकांना इंटर्नशिपची योजनेचीही घोषणा करण्यात आली”, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.

“आपल्याला प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात उद्योजक घडवायचे आहेत. या उद्देशाने हमीशिवाय मुद्रा कर्जाची मर्यादा 10 लाखांवरुन 20 लाख रुपये करण्यात आली आहे. यामुळे छोट्या व्यावसायिकांना, विशेषतः महिलांना मदत होईल. दलित, मागास आणि आदिवासी कुटुंबांमध्ये स्वयंरोजगाराला चालना दिली जाईल”, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *