कुर्ला पोलीस ठाणे आणि ट्रान्सग्लोबल इंटरप्युनर चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इन्डस्ट्रिज फॉर अग्रीकल्चर यांचा पुढाकार
मुंबई : पोलीस पाल्य आणि बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी
कुर्ला पोलीस ठाणे आणि ट्रान्सग्लोबल इंटरप्युनर चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इन्डस्ट्रिज फॉर अग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मातोश्री बायक्काबाई दगडू होवाळे यांच्या स्मरणार्थ पोलीस पाल्य आणि आणि बेरोजगार गरजूंसाठी भव्य बेरोजगार मेळावा तसेच रोजगार मार्गदर्शन शिबीर कुर्ला पश्चिम येथील कच्छी विसा समाज हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात एचडीएफसी, कोटक एज्यकेशन फाऊंडेशन, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, मॅजिक बस, सीटी संजिवनी फाऊंडेशन, वात्सल्य ट्रस्ट, मानव अभ्यास संघ, वन्स स्टॉप रिक्र्युटमेंट, निलकंठ फाऊंडेशन, नर्सिंग नील कशी इज्युकॉम, पवार इंटरप्रायजेस, आपली मासोळी, युरेका सोल्युशन प्रा. लि., वन पाईंट, बजाज फायनान्स, स्कील डेव्हलपमेंट कार्पोरेशन, इडिया फाऊंडेशन, यशस्वी ग्रूप, युरेका एस आर सर्व्हिस, स्टार बझार प्रा. लि. अशा २२ कंपन्यांनी सहभाग घेतला. या मेळाव्यात पोलीसांचे पाल्य तसेच बेरोजगार तरूण असे 115 उमेदवार हजर होते. त्यापैकी 80 तरूणांची निवड करण्यात आली. त्यातील दोन उमेदवारांना ऑफर लेटर देण्यात आले.
यावेळी कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र होवाळे म्हणाले की,मला पोलीस खात्यात 30 वर्ष पूर्ण होत आहे. पोलीस खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मुले डॉक्टर,इंजिनिअर,पदवीधर व उच्चशिक्षित आहे. अशा बेरोजगार तरुणांची व्यथा मी जवळून अनुभवली आहे. त्यामुळे आपण ही समाजाचे काहीतरी देणे लागतो. याच सामाजिक बांधिलकेतून मला पोलीस पाल्य आणि बेरोजगार तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याची संकल्पना सुचली.पोलीस खात्यामार्फत अनेक उपक्रम राबविण्यात येतात.त्यामुळे सर्व पोलीस पाल्य आणि बेरोजगार तरुणांनी पोलिसांकडे सकारात्मक दृष्टीने बघितले पाहिजे.
समाजातील सर्व घटक मग त्या महिला असोत , वृद्ध ,युवक,बेरोजगार तरुण असोत त्यांच्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.
भविष्यात अधिकाधिक तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असून त्याबाबत स्थानिक तरूणांमध्ये जागृती घडवून आणली जाईल. कंपन्यांमध्ये संधी असून त्या उपलब्ध करून दिल्या जातील. त्यासाठी आम्ही पुढाकार घेवू. तरूणांना प्रशिक्षण देवू. तरूणांनी अशा शिबिरांमध्ये अधिकाधिक सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजक देवेंद्र कारले यांनी केले आहे.
विशेष म्हणजे या मेळाव्यात उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात आले नव्हते. तरूणांचा या मेळाव्यात उत्स्फर्त सहभाग लाभला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र होवाळे, उद्योजक जनगन्ना भंडारीवार, आयोजक अश्विन कांबळे, देवेंद्र कारले, सुलतान सय्यद, अमर वैदू इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.