मुंबई : आर्यन खान प्रकरणानंतर आता राजकीय दिवाळी सुरू झालीय. दिवाळी संपल्यानंतर बाँम्ब फोडण्याची घोषणा करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अंडरवर्ल्डचा बॉम्ब फोडला. मंत्री नवाब मलिक यांचा थेट अंडरवर्ल्डशी संबध असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. मात्र फडणवीस यांच्या बॉम्बनंतर मलिक यांनी हाड्रोजन बाँम्ब फोडण्याची घोषणा केली. त्यामुळे दिवाळी संपली तरी राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बाँम्ब फोडण्याची स्पर्धा सुरू असल्याची दिसून येतेय.
२ ऑक्टोबरला मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने कारवाई करीत बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्यासह अनेकांना अटक केली. आर्यन खानच्या अटकेनंतर मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे चर्चेत आले. राज्यातील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दररोज पत्रकार परिषद घेऊन नवनवीन आराेप केला. त्यामुळे या केसला नवीन वळण लागत गेले. पण आता ड्रग्ज प्रकरण बाजूलाच राहिले असून राजकीय लढाई सुरू झाल्याचे दिसून येतय. त्यामुळे राज्यात सत्ताधारी विरूध्द विरोधक असा सामना रंगला असून हे प्रकरण कुठपर्यंत पोहचतय याकउे लक्ष लागलय.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ….
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार शाह वली खान आणि मोहम्म सलीम इशाक पटेल ऊर्फ सलीम पटेल यांचे नवाब मलिक व त्यांच्या कुटुंबीयांशी संबंध असून मलिक कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीनं त्यांच्याकडून कोट्यवधींची जमीन कवडीमोल भावात खरेदी केली आहे,’ असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबईत कुर्ला भागातील एलबीएस रोडवर गोवावाला कम्पाउंड नावााची ही जमीन आहे. नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या ‘सॉलिडस कंपनी’नं २००७ साली जमिनीचे पावर ऑफ अॅटर्नी असलेल्या शाह वली खान व सलीम पटेल यांच्याकडून ही जमीन खरेदी केली. तीन एकर जमीन अवघ्या ३० लाखांत खरेदी केली गेली. त्यातलेही फक्त २० लाख रुपये दिले गेले. त्यातील १५ लाख रुपये सलीम पटेलला व ५ लाख रुपये शाह वली खान याला मिळाले,’ असं फडणवीस यांनी सांगितलं.
नवाब मलिक म्हणाले, अंडरवर्ल्डचा काय खेळ हे सांगेन…
जे काही व्यवहार झाले आहेत त्याचे कागदोपत्री पुरावे आमच्याकडे आहेत. बॉम्बस्फोटातील आरोपीकडून कुर्ला येथील जागा आम्ही घेतलेली नाही. या प्रकरणाची चौकशी एनआयएने करू द्या अन्यथा सीबीआयने. आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. आम्ही कुणाला घाबरत नाही, असे आव्हान मलिक यांनी दिले. ‘फडणवीस, तुम्ही अंडरवर्ल्डचा खेळ सुरू केलाच आहे तर आज सारं काही मी सांगणार नाही पण उद्या सकाळी १० वाजता देवेंद्र फडणवीस आणि अंडरवर्ल्डचा काय खेळ या महाराष्ट्रात चालला होता. याची माहिती मी उद्या देणार आहे’, असे मलिक म्हणाले.