भाजपच्या माजी नगरसेवक दांम्पत्याविरोधात तक्रार : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रयाकडे न्यायासाठी साकडं !
डोंबिवली : एकिकडे कल्याण डोंबिवलीतील बेकायदा इमारतींचे प्रकरण गाजत असतानाच, दुसरीकडे वडिलोपार्जित जागेत अनधिकृत मंदिर बांधून जागा हडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याची तक्रार अशोक म्हात्रे यांनी भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याने खळबळ उडाली आहे. पालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीच कार्यवाही होत नसल्याने म्हात्रे यांनी थेट मुख्यमंत्री आणि भाजपच्या नेत्यांकडे न्यायासाठी साकडं घातलं आहे.
डोंबिवली पश्चिमेतील घनश्याम गुप्ते क्रॉस रोड येथील सर्व्हे नंबर २१/२१ पैकी व नवीन सर्व्हे नंबर ६६/१ पैकी ४६.८ गुंठे जागा वडिलोपार्जित खुली मिळकत आहे. यातील २ गुंठे जमिनीवर माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांनी नगसेवक असतानाच्या कार्यकाळात राजकीय दबाव आणून अनधिकृत मंदिर बांधून जागा जबरदस्तीने हडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे अशोक म्हात्रे यांनी तक्रारीत म्हटले आहे. याविषयी म्हात्रे यांनी प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. मात्र प्रशासनाकडून तक्रारीची अद्यापि कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. उलट तक्रार केल्याचा राग आल्याने धात्रक कुटूंबिय ४६ गुंठे जागा हडपण्यासाठी संघटीत गुन्हेगारीच्या माध्यमातून माझयावर दबाव आणून माझया विरोधातच खोटया तक्रारी करून मला मेटाकुटीला आणले आहे असे म्हात्रे यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळेच आता न्यायासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली असून, भाजपच्या नेत्यांना भेटणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
ईडीचा हस्तक्षेप आणि चौकशीची मागणी …
कल्याण- डोंबिवलीतील बेकायदा इमारती प्रकरणांवरुन ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने कारवाई केल्यानंतर आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या प्रकरणात हस्तक्षेप करुन पालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी केली असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळत आहे. एकिकडे या प्रकरणात ईडीच फास आवळला जाण्याची शक्यता असतानाच, दुसरीकडे अशोक म्हात्रे यांनीही प्रभाग क्र ६० आणि प्रभाग क्र ६१ मध्ये गेल्या १५ वर्षात एकही आरक्षित भूखंड शिल्लक राहिलेले नाही. भूमाफियांना हाताशी धरून ५ ते ७ मजल्यांचे अनधिकृत टोलेजंग इमारती उभ्या राहिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गेल्या १५ वर्षात धात्रक कुटूंबियांनी अनधिकृत बांधकामाच्या माध्यमातून कोटयावधी रूपये कमविले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपत्तीची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी म्हात्रे यांनी तक्रारीत केली आहे.
पालिका आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष ….
महापालिकेकडून बांधकाम परवाना मिळाल्याचे भासवून महारेरा कार्यालयाकडून गृहप्रकल्पांना प्रमाणपत्र घेणारे बिल्डर रेराच्या फे-यात अडकले आहेत, आता पर्यंत एसआयटीने ६७ बिल्डरांच्या विरोधात गुन्हे दाखल करून, पाच बिल्डरांना अटक केली आहे. गुन्हे दाखल केलेल्या बिल्डरांच्या बेकायदा बांधकामावर केडीएमसी बुलडोझर फिरवण्याचे आदेश पालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी प्रशासनाला दिले आहेत. एकिकडे हे प्रकरण गाजत असतानाच, दुसरीकडे माजी नगरसेवक शैलेश धात्रक व माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांच्यावर अनधिकृत मंदिर बांधल्याची तक्रार अशोक म्हात्रे यांनी दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पालिका आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे या तक्रारीवर काय निर्णय घेतात याकडे लक्ष वेधले आहे.