नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका घनसोली विभाग कार्यक्षेत्रातील अर्जूनवाडी परिसरात महापालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत प्रशासनाचे अधिकारी व्यस्त असल्याने त्याचा फायदा घेत अनधिकृत बांधकामे जोरात झाली आहेत. त्यामुळे या अनधिकृत बांधकामावर पालिका प्रशासनाकडून कधी कारवाई होईल अशीच मागणी होत आहे.
नवी मुंबई महापालिका घणसोली विभाग कार्यालय क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून लोकसभा निवडणुकीच्या कामात पालिका प्रशासनाचे अधिकारी व्यस्त असल्याने त्याचा फायदा उठवीत घनसोली अर्जूनवाडी परिसरात अनधिकृत बांधकाम जोरात सुरू आहेत. पालिकेची कोणतीही परवानगी न घेता सर्व नियम धाब्यावर बसवित अनधिकृतपणे पाच मजल्याच्या इमारतींची कामे सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीच्या कामात पालिकेचे सर्व अधिकारी गुंतलेले असल्याने या अनधिकृत बांधकामावर कोणतीही कारवाई होऊ शकलेली नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली असून घनसोली अर्जूनवाडीतील बांधकामावर पालिका प्रशासनाने धडक कारवाई करावी असा सूर नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
——–