बेकायदा सात मजली टॉवरच्या कारवाईसाठी माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांचा उपोषणाचा इशारा
डोंबिवली : कल्याण डोंबिवली शहरातील बेकायदा बांधकामावर कडक कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांकडून दिले असतानाही, डोंबिवली पश्चिमेत राजरोसपणे बेकायदा बांधकामे सुरू आहेत. कुंभारखानापाडा परिसरात भूमाफियांकडून सात मजली टॉवर उभा राहिला असून प्रशासनाकडून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या टॉवरवर कारवाई करण्यासाठी माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. गरीबांच्या चाळीवर बुलडोझर फिरविणारे प्रशासन बेकायदा टॉवरवर हातोडा कधी चालविणार असा सवाल म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.
डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग ४९ राजूनगर, प्रभाग ५० गरीबाचा वाडा येथील कुंभारखानपाडा परिसरातील सुभाष रोडवरील दिशांक सोसायटीच्या बाजूला अनधिकृतपणे १० गाळे बांधले आहेत. तसेच शिवाजी नगर येथील मॉडेल इंग्लिश स्कूलच्या बाजूला बेकायदा सात मजली टॉवर उभा केला आहे. बेकायदा बांधकामाविषयी माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे, या बेकायदा बांधकामाच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाकडून भिंती पाडून किरकोळ कारवाई करण्यात आली. मात्र पून्हा हा सात मजल्याचा टॉवर उभा केल्याने माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
तसेच केडीएमसीच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी बेकायदा गाळयांवर कारवाई करण्याचे आदेश ह प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना देऊन भूमाफियांवर एमआरटीपी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र पालिका प्रशासनाकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने म्हात्रे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत बेकायदा बांधकामाविरोधात आंदोलनाचा छेडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामांना कारवाईसाठी कुचराई केल्याप्रकरणी ह प्रभाग क्षेत्र कार्यालयात अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.