आयुक्त राजेंद्र निंबाळकर गो बॅक : शिवसेना- रिपाइं नगरसेवकांची घोषणाबाजी
महापालिकेची सभा तहकूब
उल्हासनगर : मनपा आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या विरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने त्या निषेधार्थ रिपाइं व शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज महापालिका मुख्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. मनपा “आयुक्त हाय हाय ” “आयुक्त राजेंद्र निंबाळकर गो बँक ” अशी घोषणाबाजी करीत महापालिका परिसर दणाणून सोडला आयुक्तांविरोधात नगरसेवकांचा आक्रोश वाढल्याने अखेर आजची महासभा तहकूब करण्यात आली
रिपाइं नगरसेवक भगवान भालेराव यांच्या विरुद्ध आयुक्त निंबाळकर यांनी जातीवाचक वक्तव्या केल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.आयुक्तांना अटक करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पाटील व पोलीस पथक कालपासून मनपा मुख्यालयात तळ ठोकून होते . मात्र आयुक्त निंबाळकर त्यांच्या हाती लागले नाही. मनपा सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार काल रात्री 10 .30 पर्यंत निंबाळकर कार्यालयात उपस्थित होते मात्र पोलीस त्यांना अटक करू शकले नाहीत. आज रिपाइं नगरसेवक भगवान भालेराव , शिवसेना शहरप्रमुख व नगरसेवक राजेंद्र चौधरी , गटनेता धनंजय बोडारे, उपशहर प्रमुख अरुण आशान , सुनील सुर्वे, सुमित सोनकांबळे आदींनी घोषणाबाजी केली आज मनपाच्या महासभेत पीआरपीचे नगरसेवक प्रमोद टाले यांनी महासभा सुरू होताच आयुक्त निंबाळकर यांच्या जातिवाचक वक्तव्याचा निषेध करीत, आयुक्तांना अटक करण्याची मागणी केली , शिवसेना नगरसेवक अरुण आशान यांनी देखील आयुक्तांचा निषेध करीत आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारे लोक आहोत , महापौर आपण देखील डॉ आंबेडकर यांच्यामुळेच या पदावर बसला आहात मात्र आयुक्त निंबाळकर यांनी घटनेचा मान न राखता एका सदस्याला जातिवाचक वक्तव्य करून अपमानित केले असा आरोप केला . रिपाइं नगरसेवक भगवान भालेराव यांनी दोन दिवसात निंबाळकर यांना अटक केली नाही तर पूर्ण शहरभर रिपाईतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे .सभागृह नेता जमनू पुरुसवाणी यांनी देखील आजची सभा अनिश्चित काळासाठी तहकूब करावी अशी मागणी केल्यानंतर महापौर मीना आयलानी यांनी सभा तहकुबीची घोषणा केली .