उल्हासनगर : उल्हासनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला मोठा झटका दिलाय. माजी महापौर पंचम कलानी यांच्यासोबत २२ नगरसेवकांनी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे पंचम कलानी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उल्हासनगर शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ठाणे दौऱ्यावर आले होते. या दरम्यान त्यांची पॅरोलवर बाहेर असलेल्या पप्पू कलानी व अन्य नेत्यांसोबत चर्चा झाली होती. त्यावेळीच कलानी कुटूंबिय राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. अखेर कलानी कुटूंब पून्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले आहेत. टीम ओमी कलानीसह २२ नगरसेवक व इतर १० नगरसेवक असे एकूण ३२ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कलानी यांच्या पक्षानं आजवर अनेक पक्षांशी आघाडी करत स्थानिक राजकारणात आपलं वर्चस्व टिकवलं आहे. काही वर्षांपूर्वी ते शिवसेनेसोबत होते. त्यानंतर भाजपसोबत घरोबा करून आघाडी स्थापन केली होती. आता त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळं उल्हासनगरमधील राजकीय गणिते बदलणार आहेत. उल्हासनगरात राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर होईल असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विश्वास व्यक्त केला आहे.