तीन दिवसात सव्वा लाख मुंबईकरांची वार्षिक उद्यान प्रदर्शनाला भेेेट
मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात म्हणजेच राणीच्या बागेत तीन दिवसीय वार्षिक उद्यान प्रदर्शनाच्या सुरु असून, तीन दिवसात तब्बल सव्वा लाख मुंबईकरांनी भेट दिली अशी माहिती उद्यान अधिक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

शुक्रवारपासून प्रदर्शनाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ३५ हजार, तर दुसऱ्या दिवशी सुमारे ४० हजार नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती. तर प्रदर्शनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी ४ वाजेपर्यंत सुमारे ५० हजार नागरिकांनी भेट दिली. तिसऱ्या दिवशीही नागरिकांच्या उत्साहाने उच्चांक गाठला.

गेल्यावर्षीपासून एक विषय घेऊन त्यावर आधारित पुष्परचना, वृक्षरचना या प्रदर्शनात विशेषत्वाने प्रदर्शित करण्यात येत आहेत. या वर्षी जलप्रदुषणाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने कृत्रिम नदी तयार करण्यात आली असून पाना फुलांपासून तयार करण्यात आलेली लहानग्यांची आवडती जलपरी आणि शिकारा (काश्मिरी पद्धतीची नाव) देखील या नदीमध्ये आहे. यासोबतचडॉल्फिन, स्टारफिश, ऑक्टोपस, कासव, बदक, मगर, खेकडा, ऍनाकोंडा यासारख्या जलचरांच्या वा इतर प्रकारातील प्राण्यांच्या प्रतिकृती या प्रदर्शनात होत्या. या प्रदर्शनाला सुमारे १ लाख २५ हजार नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि नाट्य–चित्रपट संबंधी क्षेत्रातील कलावंतांनी देखील भेट देऊन येथील कलाकृतींचे कौतुक केले. यामध्ये प्रामुख्याने ऋषी कपूर, फरहान अख्तर, रमेश भाटकर, मनीष पॉल, नीता शेट्टी,कमलाकर सातपुते, अन्नू कपूर, वर्षा उसगावकर, मृणालिनी जांभळे,सुनील पाल, वैशाली सामंत इत्यादींचा समावेश होता.