मनसेचे ६ नगरसेवक सेनेच्या गळाला,  भाजपचे  सत्तेचे स्वप्न धुळीस 
मुंबई : भांडूपच्या पेाटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवून सेनेकडून महापौरपद हिसकावून घेण्याची भाषा केल्यानंतर  राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला. मनसेचे सहा नगरसेवकच गळाला लावण्यात सेनेला यश आलय.  शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्या नगरसेवकांच्या हातावर शिवबंधन बांधले. शिवसेनेच्या राजकीय चालीमुळे महापालिकेतील सेनेचे बळ आणखीनच वाढले असून, भाजपचे महापौरपदाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.  मात्र शिवसेनेच्या आजच्या मास्टर स्ट्रोकचे रणनितीकार शिवसेना आमदार अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर हेच होते. या दोघांनीही काल रात्री पासूनच प्रवेश केलेल्या सहाही नगरसेवकांची मोट बांधली. आणि कायदेशीर पक्ष प्रवेश करून घेतला.

गुरूवारी भांडूपच्या पेाटनिवडणुकीत भाजपचा विजय झाल्यानंतर सोमय्यांनी सेनेच्या सत्तेला खिंडार लावून भाजपचा महापौर बसविण्याची भाषा केली होती. पोटनिवडणुकीतील पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला होता. पालिकेतील भाजपचे संख्याबळ वाढल्याने शिवसेनेची अस्वस्थता वाढली होती. मात्र सेनेने वेगळी चाल खेळीत मनसेच्या नगरसेवकांनाच सेनेच्या गळाला लावले. मनसेच्या अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, अश्विनी मतेकर, दिलीप लांडे, हर्षला मोरे आणि दत्ताराम नरवणकर या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.  मुंबईत मराठी माणसाचं हित शिवसेनाच जपते. मुंबईतून मराठी महापौर हटवण्याची भाषा भाजपने केले. त्यामुळे मराठी माणसाच्या हितासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया सेनेत प्रवेश केलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी व्यक्त केली.

घोडेबाजाराचा आरोप गाढवांनी करू नये 

घोडेबाजाराचा आरोप गाढवांनी करू नये असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपचे खासदार किरीट सोमयया यांना लगावला. मनसे नगरसेवकांच्या प्रवेशानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी सेनेने तीन कोटी रूपयांचा घोडेबाजार करून नगरसेवक विकत घेतल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.   एकिकडे मित्र पक्ष म्हणवता आणि दुसरीकडे इतर पक्षातल्या नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला तर तुमच्या पोटात का दुखते असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. मनसेच्या ६  हे नगरसेवक पूर्वाश्रमीचे शिवसैनिक होते. त्यांनी सेनेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिवसेनेने एकाच दिवसात एवढी ताकद जमवली यावरुन आमच्या ताकदीचा अंदाज आलाच असेल. भांडुपची निवडणूक भाजपने नाही, तर सहानुभूतीने जिंकली असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मनसेचा एकमेव नगरसेवक 

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सहा नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केल्याने  संजय तुर्डे हे एकमेव नगरसेवक  मनसेसोबत आहेत. दिलीप लांडे यांनी शिवसेनेत येण्याची ऑफर केल्याची माहिती तुर्डे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली मात्र मी राजसाहेबांशी प्रामाणिक असल्याचे ते म्हणाले.

 

पालिकेतील पक्षीय बलाबल = 227

  • शिवसेना अपक्षांसह – ८४ +  ४ अपक्ष = ८८
  • भाजप अभासे आणि एक अपक्षासह – ८३ +अपक्ष २= ८५
  • कॉंग्रेस – ३०
  • राष्ट्रवादी कॉंग्रेस – ९
  • मनसे – ७
  • सपा – ६
  • एमआयएम – २

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!