फेरीवाल्यांच्या मुद्दयावरून ठाकरे बंधूमध्ये श्रेयवादाची लढाई
शिवसेनेमुळेच फेरीवाल्यांवर कारवाई : उध्दव ठाकरे
राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
मुंबई : रेल्वे फूटओव्हर ब्रीजवरील फेरीवाल्यांना हटवण्याबाबत सेनेच्या मंत्रयानी मुख्यमंत्रयाना निवेदन दिलं होत. त्यानुसार कारवाईला सुरूवात झालीय अशी माहिती शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. दोन दिवसांपूर्वीच एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या निषेधार्थ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भव्य मोर्चा काढून १५ दिवसात फेरीवाल्यांना हटवा असा अल्टीमेटम रेल्वे प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे येत्या काही काळात फेरीवाल्यांच्या मुद्दयावरून ठाकरे बंधूमध्ये श्रेयवाद रंगणार असल्याचे दिसून येत आहे. यानंतर राज ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे लक्ष वेधले आहे.
शिवसेनेचे प्रक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन अंगणवाडी सेविकांचा आणि रेल्वे स्थानकांच्या परिसरातून फेरीवाल्यांना हटविण्याची शिवसेनेची मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. श्रेय घेण्याचा प्रश्न नाही पण गेल्या आठवडयात सेनेच्या मंत्रयानी तीन विषय मांडले होते त्यापैकी हे दोन विषय मार्गी लागले. तिसरा सुरक्षा रक्षकांचा विषय लवकरच सुटेल असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात कपात केली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. वसूल केलेला जीएसटी परत करणार का? लोकांपुढे दिवाळीत लक्ष्मीपूजन कशाचं करायचं, असा मोठा प्रश्न जनतेपुढं आहे. कारण सगळी ‘लक्ष्मी’ केंद्र सरकारने ओरबाडून घेतलीय असही उध्दव म्हणाले. देशातील जनतेने आणि व्यापाऱ्यांनी एकजूट दाखवल्यामुळेच सरकारला जीएसटी रचनेत बदल करावा लागलाय. सर्वसामान्य जनता एकवटली की सत्ताधारी कितीही मस्तवाल असला तरी जनता त्याला झुकवू शकते याची सुरूवात दिसू लागलीय उध्दव ठाकरे यांनी सरकारला ठणकावले.