ठाकरे- शिंदेची लढाईत निवडणुक आयोगाचा दणका
मुंबई : शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा जारी केला. या आदेशामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही. निवडणूक आयोगाचा चिन्ह गोठवण्याचा निर्णय फक्त अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात घेण्यात आला आहे. आगामी काळात ठाकरे गट आणि शिंदे गट काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या लढाईत दोन्ही गटाला निवडणूक आयोगानं दणका दिला आहे. शिवसेनेची शान असलेला धनुष्यबाण आता कुणालाही वापरता येणार नाही, एवढंच नाही तर शिवसेना पक्षाचं नावही वापरता येणार नाही. असं असलं तरी हा तात्पुरत्या स्वरुपाचा निर्णय आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठं राजकीय आव्हान निर्माण झालं आहे. शिवसेना आणि ठाकरे हे समीकरण गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्रात रुजलं आहे. या समीकरणालाच एकनाथ शिंदे यांनी आव्हान दिलं आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान आता ठाकरे गट आणि शिंदे गट पक्षाचं नाव म्हणून काय नाव वापरणार आणि पक्षचिन्ह काय निवडणार याची उत्सुकता लागली आहे. फक्त शिवसेना हे नाव दोन्ही गटांना घेता येणार नाही. पण, शिवसेनेशी संबंधित काहीही नाव घेता येईल.
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी धक्का ….
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण या ठिकाणी शिवसेनेचे आमदार होते. रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे.येत्या पोटनिवडणुकीत शिंदे गटाकडून याठिकाणी उमेदवारच दिला जाणार नाही, त्यामुळं शिंदे गटाला तसाही या निर्णयाचा विशेष फटका बसणार नाही. ठाकरे गटाला मात्र हा मोठा झटका आहे.