नागपूर : गेल्या आठवडाभरापासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज विधान परिषदेत हजेरी लावली. सीमावादाच्या मुद्य्यावरून त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी केली.
उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतला. बेळगावचे नामांतर केले गेले. मराठी भाषेवर अत्याचार केले. आम्ही इथे साधा कायदा केला, दुकानांच्या पाट्या मराठीत लावा तर त्याच्याविरोधात लोक कोर्टात गेले पण तिकडे मराठीमध्ये बोललं तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. कुठे आहोत आपण? एकाच देशातील ही दोन राज्य असल्यानंतरही हा तंटा सोडवण्याची जबाबदारी कोणाची आहे? केंद्र सरकार पालक म्हणून पालकांसारखा वागतोय का असे सवालही ठाकरे यांनी उपस्थित केले.
ठाकरेंचा शिंदेंना टोला ..
कर्नाटक सरकार एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही, अशी भूमिका घेतात. बेळगावला उपराजधानीचा दर्जा देतात. एवढेच नाही तर नावही बदलतात. कर्नाटकची वृत्ती ही कौरवी आहे. तरीही आमचे मुख्यमंत्री या प्रश्नावर ‘ब्र’ देखील काढत नाहीत, त्यांचे कर्नाटकचे मुख्यमंत्री मात्र ओरडून बोलतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले. एवढ्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा असतानाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत गेले. ते आता दिल्लीतून कधी परततील काहीच माहिती नाही. यायला निघाले आणि दिल्लीतून विमान परत बोलावले तर ते परतही जातील.” असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.