डोंबिवली : हिम्मत असेल तर कुठल्याही निवडणुका लावून दाखवा असं आव्हान रविवारी मुंबईतील उत्तर भारतीय कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिलं होतं. या आव्हानाला शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. निवडणुका लागणारचं आहेत. आम्ही सुद्धा तयार आहोत, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
डोंबिवली पूर्वेकडील ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेबल टेनिस कोर्ट आणि डोंबिवली पश्चिमेकडील पहिले वातानुकूलित अभ्यासिकचे लोकार्पण रविवारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. खासदार शिंदे म्हणाले की, निवडणुका घेवून दाखवा म्हणजे काय ? देशात महाराष्ट्रात इलेक्शन कमिशन आहे की नाही ? अभ्यास केला असेल तर कोर्टात ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना हे विषय प्रलंबित आहेत त्याच्या तारखा आहे. असे सगळे असताना निवडणूका घ्या असं बोलता आहात. निवडणुका लागू तर द्या. आम्ही पण तयारच आहोत, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
ठाकरेंना फडणवीसांचे उत्तर
ठाकरेंच्या आव्हानाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘उद्धव ठाकरे आता सर्व पक्षाचे नेते बनले आहेत. उद्धव ठाकरे असं काहीतरी बोलत असतात. संविधानांनानुसार एकत्र निवडणुका होत नाही. त्यांनी वन नेशन वन निवडणूक घेण्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र आणावं. संविधानानुसार निवडणूक होतील असे फडणवीस यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले.