सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निकाला काढावा, ठाकरेंचे आवाहन

मुंबई : शिवसेना एकच आहे, एकच राहणार. दुस-या गटाला मी शिवसेना मानत नाही. निवडून आलेले लोकप्रतिनिधी पक्ष बनवणार असतील तर उद्या देशातले  उद्योगपती देशाचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यामुळे लोकशाही धेाक्यात येऊ शकते असा निशाणा साधीत शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटावर टिका केली. सुप्रीम कोर्टाने आधी  १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निकाली काढावा, त्यानंतर निवडणूक आयोगाने आपला निर्णय द्यावा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं .

सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग या देान ठिकाणी सुरू असणा-या सुनावणीसंदर्भात उध्दव ठाकरे यांनी बुधवारी मातोश्री निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. शिवसेना कुणाची? याबाबत निवडणूक आयोग निर्णय देणार आहे. मात्र त्याआधी सुप्रीम कोर्टाने आधी  १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निकाली काढावा, त्यानंतर निवडणूक आयोगाने आपला निर्णय द्यावा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. कोणताही पक्ष जनतेच्या पाठिंब्याने स्थापन होतो. निवडून आलेले प्रतिनिधी म्हणजे पक्ष हा शिंदे गटाचा दावा हास्यास्पद आहे असंही ते म्हणाले. 

सुप्रीम कोर्टाच्या निकालात १६ आमदार अपात्र होण्याची दाट शक्यता आहे. घटनातज्ञ आणि घटनेत नमूद केल्याप्रमाणे त्याचा निकाल आधी लागावा अशी आमची अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने काय करावं हे सांगण्याचा आमचा हेतू नाही. पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका केली. अंधेरीची निवडणूक लढणार नव्हते तर आमचं चिन्ह का गोठवलं? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

शिवसेनाप्रमुख हे पद बाळासाहेब ठाकरेंना शोभून दिसतो म्हणून तो शब्द आम्ही गोठवला किंवा तसाच ठेवला. त्यानंतर मी शिवसेना पक्षप्रमुख हे पद निर्माण केलं. तशी पक्षाच्या घटनेत नोंद केली आहे. शिवसेनेत मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. ज्या शिंदे गटानं शिवसेनेवर दावा सांगितला आहे. त्यांनी शिवसेनेची घटना आम्हाला मान्य नाही असे सांगितले आहे. विभागप्रमुख हे पद शहरापुरते मर्यादीत आहे. बाकीच्या ठिकाणी नाही. शिंदे गटाने विभागप्रमुख हे पद निर्माण केलं आहे. निवडणूक आयोगानं ज्या ज्या गोष्टी सांगतिल्या त्या आम्ही पूर्ण केल्या आहेत. आम्हाला पदाधिकाऱ्यांची शपथपत्र सांगितली होती. ती देखील आम्ही सादर केली असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *