मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गोरेगाव येथील उत्तरभारतीयांच्या कार्यक्रमात हजेरी लावली. उत्तरभारतीयांना संबोधित करताना ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्दयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली. आम्ही भाजपची साथ सोडली हिंदुत्व नाही, भाजप म्हणजे हिंदुत्व नाही अशा शब्दात ठाकरें भाजपवर बरसले. कठिण काळात बाळासाहेबांनी आताच्या पंतप्रधानांचा साथ दिली. त्यामुळे ते तिथे पोहोचू शकले अशी आठवणही ठाकरे यांनी यावेळी सांगितली.
उत्तर भारतीयांशी बोलताना मन की बात नको, दिल की बात हवी, असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. शिवसेना-भाजपासाठी जेव्हा वाईट दिवस होते. तेव्हा माझ्या वडिलांनी आता जे पंतप्रधान आहेत, त्यांना वाचवलं होतं. ही गोष्ट खरी आहे. तेव्हा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते. ते राजधर्माचं पालन करण्यासाठी बाहेर पडले होते. वाजपेयी यांनी राजधर्माचं पालन केलं असतं तर आज जे पंतप्रधान पदावर बसलेत, ते तिथे बसलेले दिसले नसते.पण बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा कोणत्याही गोष्टीची पर्वा केली नाही,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणाच्याही घरात जाऊन भाकरी भाजतात. मी कधीच मराठी-अमराठी किंवा हिंदू मुस्लीम असा भेद केला नाही. बाळासाहेब कधीच असं म्हणाले नाहीत की हिंदू म्हणजे केवळ मराठी. बोहरा समाज देखील आमच्यासोबत आहे, असे ठाकरे म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांनी जो देशद्रोही असेल मग कोणत्याही धर्माचा असेल त्याला शिक्षा मिळाली पाहिजे असा विचार मांडला. गळात पट्टा बांधून गुलामी करणं हे शिवसेनाप्रमुखांनी मला शिकविलं नाही. मी महाविकास आघाडीत गेलो, याचा अर्थ मी हिंदुत्व सोडलं असा होत नाही असाही टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला.
१९९२-९३ च्या वेळी शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते त्यावेळी मराठी अमराठी असं केलं नव्हतं. करोनाच्या संकटाच्या काळात हिंदू मुस्लीम, मराठी अमराठी असा भेद केला नाही. शिवसैनिकांनी रक्तदान केलं, माणुसकी दाखवली, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पाच वर्षात आपण सगळे एकत्र असतो मग निवडणुकीच्यावेळी वेगळे का होतो, असा सवाल ठाकरे यांनी केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका देखील केली.
‘हिंमत असेल तर सर्व निवडणुका घ्या
उत्तर भारतीयांशी नातं मजबूत करायला आलोय, मला तुमची साथ हवीय, असं आवाहन त्यांनी केलं. उत्तर भारतीयांचा मेळावा नसून ही बैठक आहे. मेळाव्याला मैदान कमी पडेल, असं ठाकरे म्हणाले. ‘हिंमत असेल तर सर्व निवडणुका एकत्र घेऊन या, आम्ही तयार आहोत, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.