खालापूर : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याच्या घटनेच्या तिसऱ्या दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शनिवारी घटनास्थळी भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेत बचावलेल्या नागरिकांची भेट घेतली आणि जोपर्यंत तुमचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठिशी आहोत असे सांगितले. यात कोणत्याही प्रकारचे राजकारण येऊ देणार नाही, असे देखील ठाकरे यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले.
प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना ठाकरे म्हणाल की, या घटनेनंतर सगळया पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यायला हवं आणि एकत्रितपणे योजना राबवायला हवी. मला राजकारण करायचं नाही पण राजकारणी म्हणून ही लाजीरवाणी गोष्ट आहे असा संताप ठाकरे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात अशा अनेक वस्त्या आहेत ज्या डोंगरकपारीत आहेत डोंगर उतारावर आहेत किंवा उताराखाली आहे ज्याठिकाणी कधीही दरड कोसळू शकतात. मी स्वत: तळीये गावात गेलेलो तेव्हा पाहिलं की होत्याचं नव्हतं होतं. आता ग्रामस्थांशी काय बोलू ? कोणता भाषेत सांत्वन करू ? दरवर्षी कुठे ना कुठे अशा घटना घडत असतात. आपण हडबडून जागे होतेा. कालांतराने विषय थंडावतो. त्यामुळे माझं मत प्रामाणिकपणाने हेच आहे की, सर्वच पक्षांनी या बाबतीत तरी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यायला पाहिजे असे उध्दव ठाकरे म्हणाले.
इर्शाळवाडीच नाही तर आजूबाजूच्या ज्या काही वस्त्या आहेत त्यांना एकत्रीत करून एक योजना करायला हवी जी योजना मी मुख्यमंत्री असताना करायचा प्रयत्न करत होतो. महाराष्ट्रात जेवढया जेवढया वस्त्या आहेत त्यांचं जवळपासच्या गावांमध्ये किंवा परिसरामध्ये पुनर्वसन कसं करू शकतो हे तिथल्या जिल्हाधिका-यांना तहसिलदारांना सांगून एक योजना केली गेली पाहिजे. सरकार कोणाचंही येवा कोणाचंही जावो तरीही या योजनेला कुणीही स्थगिती देता कामा नये.एवढी माणुसकी आपण शिल्लक ठेवलीच पाहिजे असे ठाकरे म्हणाले.