मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वृत्तवाहिन्यांनाना दिलेल्या एका मुलाखतीत उध्दव ठाकरे हे माझे मित्र असून मी त्यांच्या अडचणीच काळात त्यांना मदत करण्यासाठी सर्वात आधी हजर असेन ते बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळया प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मोदी खोटं बोलत आहेत. सध्या ते स्वतःच अडचणीत आहेत. अडचणीतला व्यापारी स्वतःच्या फायद्यासाठी सर्वात जास्त खोटं बोलतो, असं चाणक्याने (कौटिल्य) सांगितलं आहे.
एका मुलाखतीत मोदी म्हणाले, उद्धव ठाकरे हे माझे मित्र असून मी त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करण्यासाठी सर्वात आधी हजर असेन. ते बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. बाळासाहेबांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. ते कर्ज मी कधीच विसरू शकणार नाही. तसेच मोदी यांनी यावेळी सांगितलं की, उद्धव ठाकरे आजारी असताना मी सातत्याने त्यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत होतो.
खासदार राऊत म्हणाले, महाराष्ट्रात आणि शिवसेनेत मोदींनीच अडचणी निर्माण केल्या आहेत. त्यांना आत्ता प्रेमाचा हा जो काही पान्हा फुटला आहे तो जर खरंच फुटला असता तर त्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तोडली नसती. त्यांनी शिवसेना नुसतीच तोडली नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं नाव त्या बेईमान माणसाला (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) देण्याचे कृत्य केलं. त्यांनी शिवसेनेचा धनुष्य त्या बेईमान माणसाच्या हातावर ठेवला. त्यामुळे हे जे काही प्रेम उफाळून आलंय ते खोटं आहे.