मुंबई, दि.१६: धारावी पूर्नवसन प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शनिवारी अदानींविरोधात मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केले. यावेळी उध्दव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यातील सरकार जनतेच्या दारी नसून अदानीच्या दारी असल्याची टीका केली.

धारावीतील टी-जंक्शन येथून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात उध्दव ठाकरे, संजय राऊत,अदित्य ठाकरे, अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, अंबादास दानवे, अनिल परब, सुषमा अंधारे, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड आदी उपस्थित हेाते. मोर्चेला संबोधीत करताना ठाकरे म्हणाले की, हा लढा आता केवळ धारावीपुरता मर्यादित नसून महाराष्ट्राचा झाला आहे. अडीच वर्षे यशस्वीपणे चालणारे सरकार गद्दारी करून त्यामुळे पाडले. त्यासाठी कोणी खोके पुरवले, विमाने, हॉटेल बुकिंग कोणी केली, हे ही आता तुम्हाला कळाले असेल. जोपर्यंत सत्तेत होतो, तोपर्यंत त्यांना काहीच करता आले नाही असेही ठाकरे म्हणाले.

मुंबईत बीडीडी चाळीचा पुर्नविकास होत आहे. तेथील चाळींच्या पुर्नविकासात 500 चौरस फुटाची सदनिका देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्याच धर्तीवर धारावीचा पुनर्विकास राज्य सरकारने करावा असेही ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. धारावीकरांना त्याच जागेवर घरे न दिल्यास पापडासारखे वाळत घालू, चप्पलने थोबाड फोडू असा इशारा दिला. कोरोना सारख्या महामारीत दिल्लीतून थाळी वाजवाचे नारे दिले जात होते. आम्ही योग्य प्रकारे नियोजन करत कोरोनाशी दोन हात केले. कोरोनाशी जिंकलेली धारावी अशी शरण जाणार नाही, असे ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावले.

अडकित्याने ठेचून काढू …

अदानींची सुपारी काहींनी घेतली असून त्या सुपारीबाज आणि दलालांची दलाली खलबत्ता आणि अडकित्ताने ठेचून काढू, असा इशारा दिला. ५० खोके कमी पडल्याने धारावी आणि मुंबई गिळंकृत करायला निघालेत अशी टीकाही ठाकरे यांनी केली. सब भूमी अदानीकी होऊ देणार नाही असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

देवेंद्र फडणवीसांवर टीकेचे बाण

धारावी पुनर्विकासाचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढल्याचा भाजपचा आरोप आहे. परंतु, २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अदानीला काम देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये जनतेच्या हिता विरोधात एकही अद्यादेश काढला नाही, असा खुलासा ठाकरेंनी केला. तसेच अदानीला काम देण्याचा प्रस्ताव फडणवीस यांनी काढला असून, हे पाप त्यांचेच असल्याचा टोला लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!