मुंबई : उद्या आपला वर्धापन दिन आणि परवा जागतिक गद्दार दिन. आपल्या लोकांनी केलेल्या गद्दारीला एक वर्ष पूर्ण होत आहे. तुम्ही जोपर्यंत माझ्यासोबत आहात तोपर्यंत कितीही अफझलखान, शहा आले तरी मला फरक पडत नाही’, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. एवढी सत्तेची मस्ती दाखवायची तर मणीपुरमध्ये दाखवा. मोदी अमेरिकेत चाललेत. मणीपुरमध्ये जायला तयार नाही. मणीपुर शांत करून दाखवा असे आव्हान वजा इशारा ठाकरे यांनी मोदी शहांना दिले.
ठाकरे गटाचं वरळीत राज्यव्यापी शिबीर पार पडलं. यावेळी ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. ठाकरे म्हणाले, कागदावर पाहिलं तर माझ्याकडे काहीच नाही. ना पक्षाचं नाव आहे ना चिन्ह. सगळी पदं भोगून सत्तेच्या मोहापायी लाचार मिंधे खोक्यासाठी पलीकडे गेले. आता माझ्या हातात तुम्हाला देण्यासारखं काहीच नाही. तरीही तुम्ही सोबत आहात. तुम्ही माझ्यासोबत असल्याने कोणाची चिंता करायची गरज नाही.
‘हे उपरे आपल्या घरात येऊन दमदाट्या करतात, फोडाफोडी करतात. आम्ही नामर्द नाही. सत्तेची मस्ती आणि फुगा फोडायला आम्हाला वेळ लागणार नाही. एवढीच मस्ती असेल तर मणिपूरमध्ये पाठवा. ईडी-सीबीआयचे अधिकारी मणिपूरमध्ये पाठवा. जातायत का बघा आणि गेले तर परत येतायत का बघा. जाळून टाकतील. तिकडे लोकं अमित शाह यांनाही जुमानत नाहीत. अमित शाह यांनी काय केलं ? असा सवाल ठाकरे यांनी केला.
मोदी अमेरिकेत चालले आहेत, पण मणिपूरला जायला तयार नाहीत. विश्वगुरू अमेरिकेत जाऊन तुम्ही विकत घेतलेल्या लोकांसमोर तुमचं ज्ञान पाझळणार. रशिया-युक्रेनचं युद्ध थांबवलं अशी भाकडकथा सांगितली. ही भाकडकथा सत्य करयाची असेल तर मणिपूर शांत करा. मोदींनी मणिपूरमध्ये जाऊनच दाखवावं, बघू शांत होतं का’, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे.
आम्ही कमळाबाई म्हणतोय म्हणून उद्या काही बोलणार असाल तर विसरू नका, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय. आम्ही सत्तेत नसताना कधी हिंदू मुस्लीम दंगली झाल्या नाहीत. तुम्ही आल्यावरच दंगली का होतायत ? असा सवाल करीत, हिंदू जन आक्रोश काश्मिरात जाऊन दाखवा. तिकडे हिंदू काश्मिरी पंडितांना दाखवा. तुमचं हिंदुत्व गेामुत्रात अडकलेलं आहे. शेंडी, जानव्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. तुम्ही तुमच्या आईच्या कुशीवर वार करून गेला आहात हे लक्षात ठेवा”, असं ठाकरे म्हणाले. हिटलर एका दिवसात जन्माला आला नाही. त्यानेही सगळ्यात आधी मीडियावर प्रतिबंध आणले. छळ छावण्या सुरू केल्या. विरोधकांना संपवलं. कत्तली झाल्या . आपल्या देशाची वाटचाल हिटलरच्या दिशेने चालली नाही ना ? असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला.
अयोध्या पौळवर शाईफेक झाली, शिंदे या महिलेला मारहाण झाली. आता महिला गुंड तयार झाल्या आहेत. या पुढं अन्याय करणाऱ्यांना शिवसैनिक काय असतं ते दाखवून द्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही हात उचलू नका कुणी हात उचलला तर हात वेगळा करा, असा आदेश उद्धव ठाकरेंनी दिला.
फडणवीसांवर जहरी टीका ..
उध्दव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली. सहनही होत नाही आणि सांगातही येत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस. कर्नाटक सरकारनं सावरकरांविषयीची धडा अभ्यासक्रमातून वगळला त्यावर उद्धव ठाकरे यांचे मत काय असा सवाल फडणवीस यांनी विचारला होता त्यावर बोलताना ठाकरे यांनी म्हणाले की, देवेंद्रजी सावरकरांचा धडा वगळला याचा निषेध शिवसेना करते. पण ज्या सावरकरांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरणयातना भोगल्या त्या सावकरांच्या विचारधारेशी ज्यांचा काडीमात्र संबंध नाही त्यांना तुम्ही सहभागी करुन घेता याबद्दल तुमचे मत काय ? असा प्रश्न ठाकरेंनी यावेळी विचारला. जर तुम्ही खरे सावरकरप्रेमी असाल तुमच्या वरती जे बसले आहेत जसे राऊत म्हणाले आमचा एकच बाप आहे, तर तुमचे किती हे तुम्हालाच माहिती….कारण मध्ये जाहिरात आली होती. त्यात बाप बदलला होता. नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा वेगळाच फोटो….तर तुम्ही खरे सावरकर प्रेमी असाल तर देशावर हक्क सांगणाऱ्या तुमच्या नेत्याचा धिक्कार करा. असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
मग बोबडी का वळते..अमित शहांना प्रतिउत्तर
नांदेड येथील सभेत अमित शहांनी उध्दव ठाकरेंकडे तीन प्रश्नांची उत्तरे मागितली होती त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, अदानीवरून प्रश्न विचारला तर बोबडी वळते. तुम्हा प्रश्न विचारला राहुल गांधींना घराबाहेर काढता आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता असे ठाकरे म्हणाले. ३७० ला आमचा पाठिंबाच पण अजूनही निवडणुका घेऊ शकत नाही याचे उत्तर द्यावे तिथला हिंदू सुरक्षित नाही, अजूनही काश्मिरी पंडित परतलेला नाही. मणिपूरला काय गोमूत्र शिंपडणार आहात ? समान नागरी कायदा काय आहे, हे एकदा स्पष्ट करा. हिंदुंनाच त्याचा त्रास होणार आहे. समान नागरी कायदा आणणार असाल तर राज्यकर्ते म्हणून सर्वांना समान न्याय द्या, दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा ‘समान’ विचार आहे का ?” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
तुमचं हिंदुत्व स्पष्ट कराच…मोहन भागवतांना आवाहन
उध्दव ठाकरे यांनी मोहन भागवत यांनाही आवाहन दिलं. ठाकरे म्हणाले की, मोहनजी भागवत, तुम्ही तुमचं हिंदुत्व स्पष्ट कराच. तुम्ही मशिदीमध्ये जाता, तिकडे भाजप महेबुबा मुफ्ती यांच्यासोबत जातं, वारकऱ्यांवर हात उचलला जातो. त्यामुळे खरंतर तुम्ही तुमचं हिंदुत्व स्पष्ट करा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.